ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – गुहागर तालुक्यातील निसर्गरम्य अशा हेदवी समुद्रकिनारी असलेल्या बामणघळ येथे पर्यटक पती-पत्नीचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अनंत माणगावकर (36) आणि सूचना माणगावकर (33) रा. ठाणे अशी पती-पत्नीची नावे आहेत. नववर्षाच्या प्रारंभीच हेदवी समुद्र किनारी या पती-पत्नी पर्यटकांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने फिरायला आलेल्या अनेक पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
निसर्गरम्य म्हणून प्रसिद्ध असलेले गुहागर तालुक्यातील हेदवी बामणघळ हे ठिकाण प्रसिद्ध आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी आलेल्या पर्यटकांना या ठिकाणी भुरळ न पडली तर नवलच. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची रेलचेल असते. याच वेळेला समुद्रकिनारी असणाऱ्या बामणघळावरील लाटेशी मौजमजा करत असताना ठाणे येथील पती-पत्नी सेल्फी काढत होते. त्यावेळी आलेल्या समुद्राच्या लाटे बरोबर पत्नीचा तोल गेला आणि ती पडली. पत्नी पडताना पाहून पतीने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला असता त्याचाही तोल गेला. स्थानिक तरुण व पोलिसांनी मिळून त्या दोघांचे मृतदेह बामणघळीतून बाहेर काढले. मदतकार्यात सुहास भाटकर, अंगद भाटकर, गजानन पवार, अमेय हलदणकर, दीपक भाटकर, मिलिंद पाटेकर, सरपंच गजानन हेदवकर, रवींद्र मोहित यांनी सहकार्य केले.







