फोटोग्राफी ते निर्माता असा यशस्वी प्रवास करणारा सर्वसामान्य पोलीसपुत्राचा एक प्रवास …

rakesh-raut

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – चित्रपटसृष्टीत नशीब आजवण्याचा बरेचजण प्रयत्न करतात. मात्र सर्वच यशस्वी होतात असे नाही. पण आपल्या मेहनतीच्या व प्रामाणिकतेच्या जोरावर अनेकजण यशस्वी होतात त्यापैकीच एक म्हणजे राकेश राऊत. त्यांचा प्रवास जाणून घेण्यासाठी त्यांची आमच्या बुलंद पोलीस टाइम्सच्या प्रतिनिधीने भेट घेतली होती.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, चित्रपट निर्माता म्हणजे तुम्हाला वाटत असेल की, मी कुणा गर्भश्रीमंत घरातला मुलगा असेन किंवा फिल्मी घराण्याशी संबंधित असेल. पण असे काहीही नाही. मी एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आहे. १९७६ साली माझे वडील श्री नारायण कृष्णा राऊत मुंबई पोलीस दलात ‘पोलीस शिपाई’ म्हणून भरती झाले. नंतर ते स्वकर्तृत्वावर पोलीस उप-निरीक्षक (PSI) या पदावर कार्यरत झाले आणि आता ६ वर्षे झाले त्यांना सेवानिवृत्त होऊन. मी नायगाव पोलीस वसाहतीत त्यांसोबत राहिलो आहे. पोलीस वासहतीतल्या जीवनाचं वास्तव म्हणजे दुर्गंधी, भेगाळलेल्या भिंती, आणि अंधार. चार भिंतीच्या आड दडलेले पोलीसांचे खाजगी आयुष्य मी जगलो आहे. खूप हालाखीचे दिवस मी पाहिले आहेत.

वडिलांच्या तुटपुंज्या पगारात घर चालत नसे. लहानपणी मी आजारी पडल्यावर माझी आई शेजाऱ्यांकडून पैसे घेऊन मला दवाखान्यात नेत असे. आजही अशा घटना आठवल्या कि अंगावर काटा येतो. माझे माध्यमिक शिक्षण आर एम भट्ट हायस्कूल, परळ येथे झाले. लहानपणापासूनच छायाचित्रणाचा छंद होता. शाळेत असतानाच वयाच्या बाराव्या वर्षी कॅमेरा हातात घेतला. आठवी पूर्ण करेस्तोवर कमर्शीयल फोटोग्राफीचे शिक्षण मी पूर्ण केले. शालेय शिक्षण सुरु असतानाच लग्न व इतर समारंभाच्या फोटोंच्या असाईंमेन्ट मी घेऊ लागलो. कालांतराने मॉडेल फोटोग्राफी आणि कमर्शीयल फोटोग्राफी करण्यास सुरुवात केली.

दहावी नंतर महर्षी दयानंद महाविद्यालय, परळ येथे प्रवेश मिळवला. त्याचदरम्यान २००० साली ‘घरात वरात’ या नाटकाच्या फोटोग्राफीने करमणूक क्षेत्रात पदार्पण केले. कामे वाढू लागली. शिक्षण सुरु होतच. बारावी नंतर कॉम्पुटर सॉफ्टवेअरचा डिप्लोमा केला. शिक्षण सुरु असतानाच कामाचा ओघ वाढू लागला. नाटकांपाठोपाठ सीरियल्स आणि चित्रपटांच्या फोटोग्राफीची कामेदेखील मला मिळू लागली. २००२ साली ‘सिद्धिविनायक प्रॉडक्शन’ मध्ये स्टिल फोटोग्राफर म्हणून काम मिळालं. कामाप्रती असलेल्या माझ्या निष्ठेमुळे लवकरच माझ्यावर ‘कार्यकारी निर्मात्याची’ जबाबदारी सोपवण्यात आली.

कार्यकारी निर्माता म्हणून मी ११ चित्रपट केले. आयुष्यातील हा काळ माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला. अनुभवाची पोतडी बऱ्यापैकी भरल्यावर मी हे काम सोडलं. मात्र त्यानंतरचा २ वर्षाचा कालावधी माझ्यासाठी खूपच वाईट होता. अनुभव असूनही मला कोणतेही काम मिळत नव्हते. चित्रपट सुष्ट्रीत काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या स्ट्रगलमधला हा कालावधी सर्वात वाईट असतो. मात्र खचून न जाता, अशा प्रतिकूल परिस्थितीतही २००६ साली मी “राकेश राऊत प्रॉडक्शन” ही चित्रपट कंपनी सुरु केली.

११ जुलै २००६ मध्ये मुंबईत बॉम्बस्फोटांची मालिका घडली. दहशतवादाच्या या रौद्र रुपामुळे मुंबईकर आणि पोलीस यांमधील नातंही दूषित झालं. मात्र पोलीसांच्याच सोबत आयुष्य घालवलेल्या माझ्यासारख्या निर्मात्याला हे नातं पुन्हा एकदा भक्कम व्हावं अस वाटू लागलं. यातूनच ‘बॉम्बस्फोट व दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी पोलीस व जनतेचा एकमेकांशी समन्वय व सुसंवाद आवश्यकता’ या माहितीपटाची निर्मिती केली. याचे प्रसारण ‘सह्याद्री वाहिनी’ आणि ‘सहारा मुंबई’ या वाहिन्यांवर प्रदर्शित झाले. ‘राकेश राऊत प्रॉडक्शन’ च्या या पहिल्याच कामाला लोकांच्या पसंतीची भरभरून दाद मिळाली. त्यानंतर डॉक्यूमेंट्री, शॉर्ट फिल्म, जाहिराती अशी काम सुरु राहिली. २००७ मध्ये #पुसेगावचेसंतसेवागिरीमहाराज आणि २००९ मध्ये #यमाईच्यानावानंचांगभलं या चित्रपटांनी ‘राकेश राऊत प्रॉडक्शन’ ला नवी ओळख निर्माण करून दिली. रसिकांच्या पसंतीची पोच या चित्रपटांना मिळाली, त्याचबरोबर हे चित्रपट व्यावसायिक दृष्ट्यादेखील यशस्वी ठरले.

१३ ऑगस्ट २०१८ पासून सुरू झालेल्या #बाळूमामाच्यानावानंचांगभलं आणि २७ मे २०१९ पासून सुरू झालेल्या #श्रीलक्ष्मीनारायण या कलर्स मराठी वाहिनीवरील मालिकांचे #सहनिर्माता म्हणून काम करीत आहे. अवघ्या तेविसाव्या वर्षी यशस्वी निर्माता झाल्याबद्दल अनेक थोरामोठयांचे आशीर्वाद मला लाभले. अनेक मान्यवरांची साथ मला मिळाली. सर्वात लहान चित्रपट निर्माता अशी माझी ओळख बनली. ‘पोलीस वसाहती’ मधल्या दहा बाय दहाच्या खोलीत राहूनही, चाकोरीबद्ध आयुष्य झुगारून “फोटोग्राफर ते निर्माता” हा प्रवास केवळ अविश्रांत मेहनत, जिद्द आणि आई वडिलांचे आशीर्वाद यामुळेच मी यशस्वीरीत्या पार पाडू शकलो आहे. आपल्या प्रेमामुळे यापुढेही निर्माता म्हणून माझा प्रवास सुरूच राहील आणि अधिकाधिक चांगल्या कलाकृती मी आपल्या समोर सादर करेन, असेही शेवटी राकेश राऊत म्हणालेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here