कोटनाका – काळाधोंडा येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी कोटनाका रेल्वे स्टेशन येथे सुरु असलेले काम केले बंद !!

uran-andolan
  • प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागणीकडे राज्य व केंद्र सरकारचे जाणून बुजून दुर्लक्ष !!!
  • जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार !!!!!!

उरण (विशेष प्रतिनिधी जगदीश काशिकर) – रायगड जिल्हा: उरण तालुक्यातील कोटनाका काळाधोंडा येथील शेतकऱ्यांच्या जमिनी सिडको व रेल्वे प्रशासनाने संयुक्तपणे रेल्वे प्रकल्पासाठी संपादित केले मात्र त्याबदल्यात आजपर्यंत येथील शेतकऱ्यांना कोणतेही मावेजा, मोबदला अथवा नुकसान भरपाई मिळालेली नाही. अनेक वेळा सिडको व रेल्वे प्रशासनाकडे कायदेशीर, रीतसर पत्रव्यवहार करून देखील आजपर्यंत रेल्वे अथवा सिडको प्रशासनाने एकही मिटिंग घेतली नाही. अथवा सिडको किंवा रेल्वे प्रशासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली नाही. उलट शेतकऱ्यांच्या आंदोलनात फूट पाडण्याचा सिडको व रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न चालू आहेत. सिडको व रेल्वे प्रशासन चर्चेला सुद्धा तयार नाही. सुरवातीपासूनच रेल्वे व सिडको प्रशासनाने येथील शेतकऱ्यांच्या महत्वाच्या समस्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्याने रेल्वे व सिडको प्रशासना विरोधात निषेध व्यक्त करत स्थानिक रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती सेवा संस्था काळाधोंडा तसेच कोट ग्रामसुधारणा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने उरण तालुक्यातील कोटनाका रेल्वे स्टेशन येथील काम बंद करण्यात आले.

कोटनाका रेल्वे स्टेशन येथील नुकसान भरपाई संदर्भात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सर्व शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री सुनील तटकरे, राज्यमंत्री आदितीताई तटकरे, उरणचे विद्यमान आमदार तथा भाजप नेते महेश बालदी,शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार तथा शिवसेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष मनोहर भोईर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, मनसेचे नेते संदेश ठाकूर, शेतकरी कामगार पक्षाचे कुंदन पाटील, काँग्रेसचे प्रकाश पाटील तसेच विविध राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांना निवेदने दिली. या विषयावर सविस्तर चर्चा सुद्धा केली. व या समस्या सोडविण्याची मागणी संबंधित शेतकऱ्यांनी या सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांकडे केली होती. uran-farmer

स्थानिक रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती सेवा संस्था काळाधोंडा व कोट ग्रामसुधारणा मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या समस्या जाणून घेऊन या सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी सकारात्मक भूमिका घेत काळाधोंडा येथील शेतकऱ्यांना योग्य ते न्याय देण्याची भूमिका घेतली. सर्वच राजकीय पक्षांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. विद्यमान आमदार महेश बालदी यांनी याबाबत आपण वरिष्ठांपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. खासदार श्रीरंग बारणे यांनी लवकरच संघटनेची सिडकोची व रेल्वे प्रशासनाची संयुक्त बैठक घेणार असल्याचे सांगितले. प्रशांत पाटील तसेच मनोहर भोईर यांनीहि सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले होते मात्र अद्यापही एकही बैठक झाले नसल्याने सिडको व रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ व बेजबाबदारीच्या कारभाराबद्दल प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

लोकशाही मार्गाने, शिस्तीने, शांततेने यातून मार्ग निघेल अशी शेतकऱ्यांची आशा होती मात्र सिडको व रेल्वे प्रशासन चर्चेसाठी तयारच नसल्याने हा प्रश्न आता अधिकच गुंता गुंतीचा व जटिल बनत चालला आहे. जोपर्यंत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कोटनाका रेल्वे स्टेशन येथील रेल्वे प्रकल्पाचे काम बंदच ठेवण्यात येईल असे स्थानिक रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती सेवा संस्था काळाधोंडाचे अध्यक्ष नवनीत भोईर, कोट ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष निलेश भोईर यांनी ठेकेदार व प्रशासनाला ठणकावून सांगितले. यावेळी कोटनाका रेल्वे स्टेशन येथे काम बंद करण्यात आले. यावेळी स्थानिक रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती सेवा संस्था काळाधोंडा व कोट ग्रामसुधारणा मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कायदेशीर मार्गाने, शांततेच्या मार्गाने लढा देऊन सुद्धा न्याय मिळत नसल्याने या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा कोणी वाली आहे कि नाही असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.uran-news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here