खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – कोरोनाच्या कालावधीत कमी लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळे पार पडत आहेत. मात्र औरंगाबादमध्ये एक लग्न चक्क पोलीस स्टेशनमध्ये लागल्याची घटना घडली आहे. या लग्नाला वऱ्हाडी म्हणून पोलीसच हजर होते.
याबाबत समजलेली माहिती अशी की, औरंगाबादमधील पुंडलीकनगर पोलीस स्टेशनमधील गुन्हेगारांची हजेरी घेणारे पोलीस लग्नाच्या तयारीत गुंग झाले होते. लग्न होतं रुपाली आणि विवेकचे. दोघंही उच्चशिक्षित. सात वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध होते. पण रुपालीच्या घरच्यांचा लग्नाला विरोध होता. या विरोधातून रुपालीला घरातच कैद करण्यात आले होते. तिनं नैराश्यातून एकदा आत्महत्येचा प्रयत्नही केला. शेवटी विवेकनं पोलिसांची मदत मागितली. पोलिसांनीच मग या जोडप्याच्या विवाहाची तयारी केली.
लग्नात पोलीसच वऱ्हाडी होते. वधूवरांच्या पित्याची भूमिकाही पोलिसांनीच निभावली. निवडक लोकांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडलं. पालकांनी मुलांना समजावून घ्यावं अशी साद नवदाम्पत्यानं घातली. अगदी साधेपणानं हे जगावेगळं लग्न पार पडलं. झालं गेलं गंगेला मिळालं हे समजून पालकांनीही या नवदाम्पत्याला शुभाशिर्वाद द्यावेत हीच अपेक्षा.







