गाडी खोल पाण्यात बुडाल्याने चालक तरुणाचा मृत्यू
पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – आजकाल पत्ता शोधण्याचा सोपा मार्ग म्हणजे गुगल मॅप. मॅपच्या साहाय्याने लोकेशन ऑन करून हव्या त्या पत्त्यावर तुम्हाला जाता येऊ शकतं. पण, कधीकधी मॅपवर अतिविसंबून राहण्यात चूक होऊ शकते. अशीच चूक एका माणसाच्या जिवावर बेतली आहे.
गुगल मॅप्सवर पत्ता शोधण्याच्या नादात गाडी धरणात शिरून एका व्यक्तिचा मृत्यू झाला आहे. सतीश घुले (34) असं या व्यक्तिचं नाव आहे. व्यावसायिक असलेले सतीश यांनी त्यांचे मित्र गुरू आणि समीर यांच्यासमवेत महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असणाऱ्या कळसूबाईला जाण्याचा बेत आखला होता. मात्र, त्यांच्यापैकी कुणालाही या प्रवासाचा अनुभव नव्हता.
या शनिवारी त्यांनी एकाच गाडीने गुगल मॅपच्या मदतीने पत्ता शोधत जाण्याचं निश्चित केलं आणि ते पुण्याहून निघाले. गुगल मॅपच्या आधारे ते गाडी चालवत निघाले. गुगल मॅपने त्यांना वाटेत कोटुल ते अकोले हा रस्ता सगळ्यात जवळचा रस्ता दाखवला. त्यामुळे त्यांनी शहानिशा न करता सरळ गाडी त्याच रस्त्याने नेली. पण, त्या वाटेत पिंपळगाव खांड धरण होतं.







