“ज्योतिने”,” तेजाची” आरती होऊ द्या. माडगूळकरहो माणदेशाचे नेतृत्व करा, या !

G.D.-Madgulkar

आटपाडी (प्रतिनिधी) – माणदेशाला त्याच्या सांस्कृतीक क्षेत्रात आघाडी घेण्यासाठी नव्या पिढीच्या माडगूळकरांनी पुढे यावे असे आवाहन शासननियुक्त, ग.दि. माडगूळकर स्मारक समितीचे अशासकीय सदस्य तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य आटपाडीचे सादिक खाटीक यांनी केले आहे. गदिमा जयंतीच्या औचित्याने माडगूळे येथे होत असलेल्या गदिमा कविता महोत्सवाच्या निमित्ताने सादिक खाटीक यांनी हे आवाहन केले आहे.

माणदेशाला आणि माणदेशी माणसांना विविध कारणांसाठी महत्व आहे . तसेच आधूनिक वाल्मीकी ग.दि. माडगूळकर आण्णा आणि व्यंकटेशतात्या माडगूळकर यांच्यामुळेही आहे . अनेक माणदेशी रत्नांनी या मातीचा पांग फेडला पण पुढच्या पिढीत वारसा चालविला तो माडगूळकरांनीच . श्रीधरजी,आनंदजी ,ज्ञानदाताई यांनी ही शब्द पालखी पुढे नेली, आता माणदेशाला त्याच्या सांस्कृतीक क्षेत्रात आघाडी घ्यायला नव्या पिढीच्या माडगूळकरांनी पुढे आले पाहीजे.

महाराष्ट्राचे आधूनिक वाल्मीकी म्हणून गदिमांवर महाराष्ट्राने जीवापाड प्रेम केले आहे . माणदेशाच्या दुष्काळी दुःखाला वाचा फोडणारी बनगरवाडी माणदेशी मातीतील भोळ्या भाबड्या माणसांना अजरामर करणाऱ्या साहित्य कृतीला निर्माण करणारे व्यंकटेश तात्या माडगूळकर यांना माणदेशाने आपल्या काळजात जपले आहे . त्यांची जयंती, पुण्यतिथी हाच केवळ त्यांची आठवण काढण्याचा क्षण आहे असे माणदेशाला वाटत नाही. रोजच कुठे ना कुठे, इथे त्यांच्या नावाचे, कामाचे पारायण होत असते . म्हणूनच गदिमांच्या मातुल आजोळी शेटफळे येथे १९९० च्या ही आधी पासून ग्रामस्थ त्यांची जयंती आणि पुण्यतिथी भक्ती भावाने साजरी करतात .

वास्तवीक या गावात माडगूळकरांच्या मामांचे वंशज गेली ५० वर्षापासून रहात नाहीत , पण तिथल्या शेतकन्यांनी, पशुपालकांनी त्यांची स्मृती जिवंत ठेवली आणि म्हणूनच शासनाने आधूनिक वाल्मीकीच्या जन्मगावी टुमदार स्मारक साकारले . अपूरे असले तरी ते स्मारक तिथल्या पिढ्यासाठी ज्ञानमंदिर आहे आणि हा ज्ञानयज्ञ तेथे सदैव सुरु असतो . शिक्षकाचे, प्रज्ञावंताचे गाव अशी ओळख असणाऱ्या शेटफळेत पुढची पिढी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेबरोबरच गणित, विज्ञान आणि इतिहास भुगोलाचे धडे त्या स्मारकात बसून घेतात . ज्यांच्या घरी अभ्यासाला वातावरणही नाही, अशांसाठी तसेच अन्य विद्यार्थ्यांच्यासाठी हे स्मारक ज्ञानाचे अमृतकण पाजणारे अधिष्ठान बनलेले आहे . दगडा ,विटांची स्मारके तर अनेक बनतात, काळाच्या प्रहारात उध्वस्त होतात तिथे मग कोणी पणती ही लावत नाही. पण गदिमांच्या स्मारकात निरंतर ज्ञान यज्ञ सुरु आहे . शिक्षण हेच बहुजनांच्या उन्नतीचे साधन ठरेल असे सांगणाऱ्या ज्योतिरावांचा संदेश घेऊन माडगूळे या माडगूळकर आण्णांच्या पितृभूमीत प्रा . टी .ए. चव्हाण यांनी १९७९ – ८० साली प्रतिवर्षी सात – आठशे मुला मुलींना ज्ञानामृत पाजणारे हायस्कुल,कॉलेज उभारले . त्याचे नाव ग.दि.माडगूळकर हायस्कूल ठेवले . एखाद्या साहित्यीकाचा असा सन्मान जनता करते याचाच अर्थ त्या जनतेच्या मनात
त्यांच्या प्रति प्रचंड आदरभाव आहे, त्या आदराला प्रतिसाद म्हणून माडगुळकर जनता माडगुळ्यात जयंती पुण्यतिथी नेमाने करीत आली आहे . आता यांच्या बरोबर माणदेशी जनतेला वाटते, पुणे स्थित माडगूळकर परिवाराने ही या माणदेशात सामील व्हावे . स्वतः कार्यक्रम करून आज पर्यत माणदेशी जनतेने माडगुळकर परिवाराची या कार्यक्रमासाठी नेहमी प्रतिक्षा केली आहे . गदिमा आणि व्यंकटेशतात्यांच्या वंशजांनी कधीतरी इथे यावे आणि इथल्या माणसांच्या चेहर्‍यावरचा आनंद पहावा . ते आल्याने त्यांचे चेहरे टवटवीत झाल्याचे ते नक्कीच पाहु शकतील .

माडगुळकर बंधू प्रमाणेच या माणदेशाचे नांव उंचावणारे अन्य संमेलनाध्यक्ष भवानराव ऊर्फ बाळासाहेब पंतप्रतिनिधी , शंकरराव खरात, ना . सं . इनामदार, राज्य,राष्ट्रीय स्तरावर गाजलेले माजी मंत्री श्री .राम नाईक,साहित्यीक अरुण कृष्णाजी कांबळे, शांताबाई कृष्णाजी कांबळे ( करगणी ) अॅड.नानासाहेब झोडगे ( माडगुळे) ,श्री प्रकाश देशपांडे चिपळूण (वलवण ), सुभाष कवडे भिलवडी ( आटपाडी ), प्राचार्य डॉ. श्री .सयाजीराजे मोकाशी ( शेटफळे ), कै. शाहीर जयंतराव जाधव (आटपाडी), प्रा.सुरेश देशपांडे पुणे (आटपाडी ), रविकुमार मगदुम विटा ( निंबवडे ), संभाजीराव गायकवाड शेटफळे, सुधीर इनामदार गोमेवाडी, चित्रपट दिग्दर्शक म.गो. तथा बाबा पाठक, एबीपी माझा मराठी न्यूज चॅनेलचे संपादक श्री .राजीव खाडेकर , प्रा.अंबादास माडगुळकर, शामकाका माडगूळकर, बाबाखान दरवेशी ( करगणी ),लावणीसम्राज्ञी सत्यभामाबाई पंढरपुरकर ( बनपुरी ) , आटपाडी तालुक्याचे शिल्पकार कै. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार कै .आण्णासाहेब लेंगरे ,जतचे माजी आमदार अॅड . दिवंगत जयंत सोहनी ( गोमेवाडी ), महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा आटपाडीचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार राजेंदआण्णा देशमुख , परिषदेच्या आटपाडी शाखेचे विद्यमान अध्यक्ष माजी जि.प. अध्यक्ष अमरसिंहबापु देशमुख , गदिमा साहित्य सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेबकाका पाटील,औंध संस्थानचे मंत्री कै.रस्तुमरावबापू सेना सुभे चव्हाण देशमुख , संस्थानचे माजी मंत्री अमिनुदीन कुरेशी, संस्थानचे माजी आमदार मिठुलाल कलाल , कलाप्रेमी कवी मनाचे शिक्षक नवसरलाल कलाल, स्वतंत्रपूरचे पहिले जेलर अब्दूल अजिज काझी मास्तर ,शिक्षण क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणारे ह. ग. देशमुख, रंगलाल कलाल , भा. दि . माडगूळकर , आकाशवाणीवर गाजलेले कृष्णराव सपाटे, जागतिक किर्तीचे मल्ल वस्ताद पैलवान श्री .नामदेव बडरे , शास्त्रज्ञ डॉ. दीपक पिंजारी , इत्यादी अनेक आटपाडी तालुक्याशी प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष संबध असलेल्यांनी माणदेशाचे नाव अजरामर केले आहे . माणदेशाचाच भाग असलेल्या जत, कवठेमहंकाळ ,सांगोला, मंगळवेढा ,माण ,खटाव ,खानापूर या तालुक्यातील साहित्यीक, प्रज्ञावंत, गुणवंत यांची ही संख्या मोठी आहे. यातील हयात सर्व प्रतिभावंताची, माणदेशी माणसांची भावना ही माडगुळकरांशी जोडलेली आहे .

गदिमा, व्यंकटेश तात्या, शंकररावजी खरात, ना . सं . इनामदारांच्या भागातल्या स्मारकांच्या मागणीला मोठा जोर लागणे महत्वाचे आहे . गदिमांचे पुणे येथे साकारत असलेले स्मारक आनंददायीच आहे . व्यंकटेशतात्यांचेही आणखी एक स्मारक पुण्यात साकारण्यासाठी यशस्वी प्रयत्न व्हावेत . त्यासाठीही आम्हीही प्रयत्न करण्यास तयार आहोत. तसेच गदिमांच्या आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथील स्मारकाला परिपूर्णता दिली गेली पाहीजे . माडगूळ्यात गदिमा आणि तात्यांच्या स्मारकाला , आटपाडीत शंकरराव खरात यांच्या आणि गोमेवाडीत ना. सं इनामदारांच्या स्मारकासाठी शासनाला जागे केले पाहीजे. ही स्मारके पिढ्यान पिढ्या या प्रतिभावंताच्या कार्य कर्तृत्वाची साक्ष देणारी परिपूर्ण स्मारके होण्यासाठी प्रत्येक स्मारकात १००० आसन क्षमतेचे सांस्कृतीक भवन व्हावे , ग्रंथालय , अभ्यासिका , मोफत वाचनालय केले जावे , यामध्ये साहित्यीकांचे समग्र साहित्य , त्यांची ग्रंथसंपदा असावी , पर्यटकांसाठी ,मान्यवरासाठी विस्तीर्ण शासकीय विश्रामगृह , शिशु विहार , बलो उदयान व सावलीचे घडयाळ करणेत यावे, वनस्पती शास्त्र युक्त प्रशस्त बाग असावी, लहान मुलांसाठी बागेत एका बाजुस पोहण्याचा तलाव , खेळांसाठी क्रिडांगण असावे, ही स्मारके पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करावीत , वृंदावन गार्डनच्या धर्तीवर सर्वच्या सर्व स्मारकांमध्ये ग . दि . माडगूळकर यांच्या गितांच्या रोषणाईचा नेत्रोत्सव असावा , माणदेशातील लोककलांचे ,लोकगीतांचे कलादालन सर्व स्मारकांचे आकर्षण ठरावे .

आटपाडी — माडगुळे, आटपाडी — शेटफळे आणि उंबरगांव — आटपाडी– भिवघाट या ३ मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा उंच आणि भव्य अशा संगमरवरी फरशांच्या ५६ होर्डींग्ज वर गदिमांच्या गीत रामायणातील अजरामर ५६ गीते चितारूण गदिमांच्या परमेश्वरी प्रतिभेला वंदन केले जावे . गदिमांच्या मातृभूमी, पितृभूमी मध्ये येणाऱ्या प्रत्येकाला आटपाडीतून माडगूळे, शेटफळेला जाताना संथ गतीने अथवा चालत जाण्याचा मोह व्हावा . इतक्या सुंदरतेने हे रस्ते गीत रामायणाच्या पवित्र गीतांनी भारले जावेत . गदिमांच्या स्वप्नातल्या आगीनगाडीला वास्तवतेचे आयाम मिळणेसाठी आटपाडी मार्गे बारामती – विजापूर आणि गृहागर – पंढरपूर या नव्या रेल्वे मार्गाची उभारणी करून गदिमा रेल्वे स्टेशन वरून भारतात मुख्य मार्गावर धावणारी गदिमा एक्सप्रेस जगभर, भारतभर विखुरलेल्या माणदेशी माणसांची अनेक वर्षाची मागणी सत्यात आणणे हीच गदिमा आण्णांना सर्वात मोठी मानवंदना ठरू शकते . गदिमांना भारतरत्न, महाराष्ट्र भुषणने गौरविले जावे. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबध असलेले पाच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देणाऱ्या आटपाडीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्हावे ही अनेक वर्षाची माणदेशी माणसांची इच्छा आहे .अशा महत्वपूर्ण गोष्टीसाठी माणदेशाला ,माणदेशी माणसांना भक्कम साथ हवी आहे माडगूळकर परिवारातल्या नवपिढीची.

इथली सांस्कृतीक भूमी सकस, निकोप आणि निखळ आहे . माडगूळकर परिवाराच्या पुढच्या पिढीच्या स्वागतासही ती सज्ज आहे . या नव्या पीढीचे स्वागत करताना माणदेशाचे, सांस्कृतीक क्षेत्राचे त्यांनी येथे येवून नेतृत्व करावे , प्रत्येक जयंती पुण्यतिथीला सण – समारंभा प्रमाणे त्यांचे दर्शन घडावे . ही इथल्या मातीची , माणसांची अपेक्षा आहे . माणदेशातल्या प्रत्येक गावात काही नवं घडविणारा, लिहीणारा साहीत्यीक घडतो आहे . अनेक प्रवाहांचे दर्शन घडत आहे . त्यांनाही मार्केटींगची आवश्यकता आहे . माडगूळकरांच्या पीढीची त्यांना साथ लाभली तर ती परस्परांच्या प्रगतीचेही कारण ठरेल . माणदेशाची भूमी ही चळवळ्या माणसांची भूमी आहे . इथल्या चळवळीला वाव देणारा, हाताला धरून महानगरापर्यत नेणारा आणि नव्या संस्कृतीपर्यत समृद्ध माणदेशी संस्कृती पोहचवणारा एक हात हवा आहे . माडगूळकर परिवाराने गदिमांची तेजाप्रमाणे आरती करावी पण त्याचवेळी माणदेशाच्या पर्णकुटीलाही कळस चढविण्याचा संकल्प करावा . इथल्या माणसांना मोठे करण्यासाठी तुमची साथ हवी आहे . या माणसांचे साहित्य समृद्ध आहे . त्यांचे मन मोठे आहे . त्यांचे विचार पक्के आहेत . फक्त त्यांना राजमान्यता हवी आहे .सगळेच पुण्यात पोहचू शकणार नाहीत म्हणून पुण्यालाही माणदेशात वारंवार यावे लागेल, श्रीधरजींनी माडगुळी डेज च्या शिषर्काखाली शब्दबद्ध केलेला माडगुळ्यातल्या आठवणींचा मागोवा , हेच प्रेम, श्रद्धा आपलेपणा दर्शविते आहे . आणि या सर्वा साठी माडगूळकरांना माणदेशाचे नेतृत्व करावे लागेल, येथे यावे लागेल, खरेखुरे माणदेशी – माडगूळकर बनावे लागेल . अशी अपेक्षा ही शेवटी सादिक खाटीक यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here