सांगलीत मोठी कारवाई: जत येथील पार्सल कंपनी फोडणारा आंतरजिल्हा चोरट्यांचा म्होरक्या जेरबंद; दीड लाखांची रोकड जप्त

सांगली

सांगली (जिल्हा संपादक संजय तोडकर) |  जत येथील ‘डिलीव्हरी लिमिटेड पार्सल कंपनी’चे कार्यालय फोडून रोकड लांबवणाऱ्या एका आंतरजिल्हा घरफोडी करणाऱ्या आरोपीला सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने नागज फाटा येथे सापळा रचून अटक केली आहे. वैभव बबन जाधव (वय २५, रा. ढोसेवाडी, मदने वस्ती, कटफळ, ता. बारामती, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरी गेलेली १,५२,००० रुपयांची रोकड जप्त केली आहे. या गुन्ह्यातील त्याचा वडील आणि रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार बबन सर्जेराव जाधव हा मात्र पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जत येथील डिलीव्हरी लिमिटेड पार्सल कंपनीचे कार्यालय दि. २४ मे २०२८ च्या रात्री ते २५ मे २०२८ च्या सकाळ दरम्यान चोरट्यांनी फोडले होते. याप्रकरणी सुभाष संभाजी कोडलकर (रा. वळसंग, ता. जत) यांनी जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या संदर्भात जत पोलिसात गुन्हा रजि. नं. ३०३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३ (२), ३०५ (ए), आणि ३३१ (४) अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते. त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांचे पथक जत भागात पेट्रोलिंग करत होते.

पेट्रोलिंगदरम्यान पथक नागज येथे आले असता, पोलीस अंमलदार सोमनाथ गुंडे आणि अमर नरळे यांना त्यांच्या खास बातमीदाराकडून विश्वासू माहिती मिळाली की, एका पार्सल कंपनीत चोरी करणारा संशयित इसम (पिवळा टी-शर्ट आणि काळी ट्रॅक पँट घातलेला) नागज फाटा येथे येणार आहे. माहिती मिळताच पोलिसांनी नागज फाटा परिसरात पाळत ठेवली. संशयित वैभव जाधव तिथे येताच, पोलिसांनी त्याला पळून जाण्याची संधी न देता जागीच ताब्यात घेतले.

पोलिसांनी पंचांसमक्ष वैभव जाधव याची अंगझडती घेतली असता, त्याच्या सॅकमध्ये १,५२,००० रुपयांची रोख रक्कम आढळून आली. सुरुवातीला त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांनी त्याला अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने पाच दिवसांपूर्वी वडील बबन जाधव याच्यासोबत मिळून जत येथील पार्सल कंपनीचे ऑफिस फोडल्याची कबुली दिली.

या गुन्ह्यातील फरार आरोपी बबन सर्जेराव जाधव (रा. बारामती) हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर कोल्हापूर, अहिल्यानगर (अहमदनगर), नाशिक, पुणे, सोलापूर आणि धाराशिव या विविध जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने कुरिअर आणि पार्सल ऑफीस फोडल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

सध्या अटक केलेला आरोपी वैभव जाधव आणि जप्त केलेली रोकड पुढील तपासासाठी जत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली असून, फरार आरोपी बबन जाधव याचा शोध पोलीस घेत आहेत.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, उपनिरीक्षक महादेव पोवार, पोलीस अंमलदार अमित परिट, अनिल ऐनापुरे, सोमनाथ गुंडे, अमोल ऐदाळे, अमर नरळे, आमसिध्द खोत, प्रकाश पाटील, श्रीधर बागडी, रोहन घस्ते, सोमनाथ पतंगे, केरूबा चव्हाण, चालक गणेश शिंदे तसेच सायबर पोलीस ठाण्याचे विजय पाटणकर, करण परदेशी आणि कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here