ठाणे (उपसंपादक प्रकाश कदम) | मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ४ च्या पथकाने अमली पदार्थ तस्करांविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी थेट तेलंगणा राज्यातील जहीराबाद येथे छापा टाकून, २ एकर फार्म हाऊसमध्ये बेकायदेशीरपणे चालवला जाणारा ‘एमडी ड्रग्स’ (मेफेड्रोन) तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. या संपूर्ण गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत तब्बल २० कोटी ७२ लाख रुपयांचा अवाढव्य मुद्देमाल जप्त केला असून एकूण १८ आरोपींना गजाआड केले आहे.
या मोठ्या कारवाईची सुरुवात ४ एप्रिल २०२६ रोजी मिरारोड येथील नयानगर परिसरातून झाली होती. नयानगरमधील बँक रोडवर असलेल्या छेडा आदर्श बिल्डिंगमधील रूम नंबर २०२ मध्ये पोलिसांनी छापा टाकला होता. तेथून महिला आरोपी फिरदोस अरबाज कुरेशी हिच्या घरातून २ कोटी ६६ लाख १७ हजार २८० रुपये किमतीचे १ किलो ३२४ ग्रॅम वजनाचे एम.डी. ड्रग्स जप्त करण्यात आले होते. हे ड्रग्स तिचा पती अरबाज वकील कुरेशी याच्या मालकीचे असल्याचे समोर आल्यानंतर, नयानगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार गुन्हा (रजि. नं. १०२/२०२६) नोंदवण्यात आला होता.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ४ ने या गुन्ह्याचा कसून तपास सुरू केला. या तपासादरम्यान पोलिसांनी मिरारोडसह मुंबईतील आग्रीपाडा, मालवणी आणि मनोरी परिसरातून एम.डी. ड्रग्स, ते तयार करण्यासाठी लागणारे केमिकल आणि लॅबचे साहित्य असा तब्बल १३.६५ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करत आधीच १५ आरोपींना अटक केली होती.
या गुन्ह्याचा पुढील माग काढत असताना पोलिसांनी २८ मे २०२६ रोजी रायगड जिल्ह्यातील खालापूर येथून आरोपी क्र. १६ संदीप विरास्वामी नायडू याला ताब्यात घेतले. त्यानंतर २九 मे २०२६ रोजी हैदराबाद येथून आरोपी क्र. १७ नसीर उर्फ बाबा जानिमिया शेख आणि आरोपी क्र. १८ महमूद मेहबूब खान यांना अटक करण्यात आली.
या आरोपींची कौशल्यपूर्वक चौकशी केली असता, मुख्य सूत्रधार नसीर उर्फ बाबा जानिमिया शेख याने पिचारगडी तांडा (ता. जहीराबाद, जि. संगारेड्डी, राज्य तेलंगणा) येथील आपल्या २ एकरच्या फार्म हाऊसमध्ये ड्रग्ज बनवण्याचा मोठा कारखाना सुरू केल्याची माहिती मिळाली.
गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ तेलंगणात जाऊन या कारखान्यावर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी ३ किलो तयार एम.डी. ड्रग्स, ड्रग्ज तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे क्लोरोफॉर्म (Chloroform), एसीटोन (Acetone), मोनोमेथिलामाइन (Monomethylamine), हायड्रोक्लोरिक ॲसिड (Hydrochloric Acid), एनडीपीएस कायद्यानुसार प्रतिबंधित असलेले ‘२-ब्रोमो’ (2-Bromo) असे एकूण २,२९३ लीटर घातक रसायन, ड्रग्ज बनवण्यासाठी वापरण्यात येणारे अत्याधुनिक लॅब साहित्य हा मुद्देमाल जप्त केला, या ठिकाणी जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत ६ कोटी २२ लाख रुपये आहे. यासह संपूर्ण गुन्ह्यातील जप्त मुद्देमालाचा आकडा आता २०.७२ कोटींवर पोहोचला आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी मिरा-भाईंदर, वसई-विरारचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ४ चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, दत्तात्रय सरक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (सफौ) मनोहर तावरे, संतोष मदने, पोलीस हवालदार शिवाजी पाटील, रवींद्र भालेराव, विजय गायकवाड, प्रवीणराज पवार, धनंजय चौधरी, हनुमंत सूर्यवंशी, समीर यादव, अश्विन पाटील, रवींद्र कांबळे, संदीप शेरमाळे, विकास राजपूत, सनी सूर्यवंशी, सचिन चौधरी आणि सायबर सेलचे सफौ संतोष चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ४ करत आहे.







