जालना येथे मतदानकेंद्राजवळच उमेदवारावर करण्यात आला अंत्यसंस्कार

funaral-process

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – सकाळी मतदान प्रक्रियेला सुरुवात होताच उमेदवाराला हृदयविकाराचा जोरदार झटका आला व यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे मतदान केंद्राच्या बाजूलाच त्यांच्यावर अंत्यसंस्काराची दुर्दैवी वेळ नातेवाईक व समर्थकांवर आली. ही घटना शुक्रवारी आज 15 जानेवारी रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असलेल्या कोठा दाभाडी या गावात घडली. प्रभाकर दादाराव शेजुळ (60) असे निधन झालेल्या उमेदवाराचे नाव आहे.

तालुक्यातील 86 ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात येत आहे. सकाळी सर्वत्र मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. सर्व केंद्रावर दुपार पर्यंत शांततेत मतदान सुरू होते.

दरम्यान, तालुक्यातील कोठा दाभाडी या सात सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीसाठी देखील सकाळी मतदान प्रकिया सुरू झाली. त्यामुळे सर्वजण मतदान करण्याच्या व करून घेण्याचा धावपळीत असतांना व मतदानाला अर्धा तास होताच येथील वार्ड क्रमांक एकचे राजुरेश्वर ग्रामविकास पॅनलचे उमेदवार प्रभाकर दादाराव शेजुळ यांच्या छातीत अचानक दुखायला लागले. त्यांना जालना येथे उपचारासाठी घेऊन जात असताना बावणे पांगरी गावाजवळ रस्त्यातच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. एकीकडे मतदान प्रकियेला सुरुवात झाली असतांना अचानक ही घटना घडल्याने गावात स्मशान शांतता पसरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here