मुंबई (विशेष प्रतिनिधी जगदीश का. काशिकर) – राज्य शासनाने जारी केलेल्या डीम्ड कन्व्हेयन्ससाठी गृहनिर्माण संस्थांनी सदस्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांनी केले. अंधेरी येथे शिवसेना उपनेते,म्हाडा सभापती डॉ. विनोद घोसाळकर मार्गदर्शनाखाली श्री समर्पण सोशल वेल्फेअर चॅरिटेबल ट्रस्ट व महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर असोसिएशनमार्फत डीम्ड कन्व्हेयन्स विशेष मोहीम -2021 या विषयावर संवादात्मक कार्यक्रमात बोलताना घोसाळकर यांनी डीम्ड कन्व्हेअन्ससाठी बिल्डर कधीच पुढाकार घेणार नाही असे सांगत गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
या कायद्याबाबत नागरिकांमध्ये आजही अनेक गैरसमज असून असल्याने त्याबाबत जनजागृती करणे गरजेचे असल्याने हा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती घोसाळकर यांनी यावेळी दिली. तर पुनर्विकासासाठी आरबीआयने घातलेली बंधने लवकरच दूर होतील असा आशावाद मुंबई बँकेचे संचालक अभिषेक घोसाळकर यांनी व्यक्त केला. आज नोटबंदी, जीएसटीनंतर अनेक गृहनिर्माण प्रकल्प रखडले असून त्याला चालना देण्यासाठी तसेच गृहनिर्माण संस्थेतील सदस्यांचा फायदा होण्यासाठी स्वयं पुनर्विकास गरजेचे असल्याचे मत घोसाळकर यांनी यावेळी व्यक्त केले.
दरम्यान राज्य सरकारने लागू केलेल्या डीम्ड कन्व्हेयन्स कायद्यामुळे गृहनिर्माण संस्थाना होणाऱ्या फायद्याबाबत महासेवाचे अध्यक्ष रमेश प्रभू यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी 90 गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधीं सहभागी झाले होते.कार्यक्रमात नागरिकांच्या शंकाचे निरसन करण्यासाठी डीम्ड कन्व्हेन्सवरील प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. याप्रसंगी शिवसेना उपविभाग प्रमुख प्रसाद आयरे,स्थानिक शाखाप्रमुख शेलार उपस्थित होते.यावेळी महाराष्ट्र सरकारच्या “डीम्ड कन्व्हेयन्स-स्पेशल ड्राइव्ह” विषयी माहिती असलेल्या पुस्तकाचे वाटप करण्यात आले.







