- वयाच्या मर्यादा अटी मध्ये दोन वर्षांनी वाढ
- अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदतही वाढविली.
अलिबाग-सोगावकर – रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष ॲड.प्रविण मधुकर ठाकूर यांनी आर.सी.एफ.प्रशासनासोबत मुंबई येथे केलेल्या चर्चेला यश आले असून, आर.सी.एफ.च्या थळ प्रकल्पामध्ये नोकर भरती करताना प्रकल्पग्रस्त व स्थानिकांसाठी वय, अनुभव व शैक्षणीक पात्रता या अटींमध्ये शिथीलता तसेच सध्याच्या नोकर भरतीसाठी असलेली अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत वाढवून मिळण्याबाबत केलेल्या मागण्यांपैकी नोकरीसाठी वयाची मर्यादा वाढविणे, पात्रता अटींमध्ये शिथीलता व 15 जुलै ही अंतिम मुदत वाढवून मिळणे या दोन मागण्या मान्य करण्यांत आल्या आहेत. तशा प्रकारचे शुध्दीपत्रक आर.सी.एफ. प्रशासनाने त्यांच्या वेबसाईटवर प्रसिध्द केले असल्याची माहिती ऍड.प्रविण ठाकूर यांनी दिली आहे. अर्ज करण्यासाठीची 15 जुलै ही अंतिम तारीख 31 जुलै पर्यंत वाढविण्यांत आली आहे. ओबीसी वर्गासाठी इंजिनियरींग पदासाठी 35 वर्ष वयाची होती, ती आता 37 वर्ष करण्यांत आली आहे, मॅनेजमेंट ट्रेनीसाठी 25 वर्षे वयाची अट होती, ती वाढवून 27 वर्षे करण्यांत आली आहे, मार्केटींग ऑफीसरसाठीचे 32 वर्षे वय होती, ती आता 34 वर्षे करण्यांत आले आहे, असीस्टंट ऑफीसर साठी 28 वर्ष वयाची अट होती, ती आता 30 वर्ष करण्यात आली आहे, ऑपरेटर ट्रेनीसाठी 27 वर्ष वयाची अट होती ती आता वाढवून 29 वर्ष करण्यात आली आहे, बाॅयलर ऑपरेटरसाठी 30 वर्ष वय असणारी अट आता 32 वर्ष वय केली आहे,आणि ज्युनीयर फायरमन साठी 27 वर्ष वयाची अट आता 29 वर्ष करण्यात आली आहे,अशी सर्व पदांसाठी दोन वर्षे वयाची शिथीलता देण्यांत आली आहे.
आर.सी.एफ.च्या थळ ता.अलिबाग येथील स्थानिकांच्या नोक-यांसदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक बोलविणे बाबत माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी आर.सी.एफ चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांना पत्र लिहीले होते. ठाकूर यांच्या पत्रानुसार आर.सी.एफ.प्रशासनाने चेंबूर-मुंबई येथे 10 जूलै रोजी बैठक आयोजित केलेली होती,सदरील बैठकीत बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या, या बैठकीत आर.सी.एफ.चे सीएमडी एस.सी.मुडगेरीकर, मधुकर ठाकूर यांचेतर्फे त्यांचे सुपूत्र व रायगड जिल्हा काॅंग्रेसचे उपाध्यक्ष ऍड.प्रविण मधुकर ठाकूर, आर.सी.एफ.चे टेक्नीकल डायरेक्टर सुधीर पानगरे, एच.आर.विभागाचे फिदवी, जनसपंर्क अधिकारी खामकर,बोरीस गुंजीसचे सरपंच महेश पडते, समिर मधुकर ठाकूर, काॅंग्रसचे तालुका उपाध्यक्ष मनोहर म्हात्रे हे उपस्थित होते. रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष ऍड.प्रविण मधुकर ठाकूर यांनी त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्याबाबत आर.सी.एफ.प्रशासनाचे सीएमडी. एस.सी.मुडगेरीकर व इतर प्रशासकीय अधिका-यांचे आभार मानले आहेत.







