मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – देशात बुधवारी विक्रमी १ लाख ८५ हजार ८२२ मेगावॉटची वीजमागणी नोंदविण्यात आली. करोना टाळेबंदीनंतर हळूहळू जनजीवन आणि अर्थचक्र पूर्वपदावर येत असल्याचा हा संकेत मानला जातो.
करोनामुळे मार्च २०२० च्या अखेरीस देशभरात टाळेबंदी लागू झाली. जनजीवन-उद्योग-व्यवसाय ठप्प झाले. जूनपासून हळूहळू निर्बंध शिथिलीकरण सुरू झाले. त्याचे काही परिणाम दिवाळीच्या आसपास दिसले आणि ‘जीएसटी’ने एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. वीजमागणी हाही अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा निकष मानला जातो. देशात बुधवारी विक्रमी १ लाख ८५ हजार ८२२ मेगावॉट इतकी वीजमागणी नोंदवली गेली. केंद्रीय ऊर्जा सचिव संजीव सहाय यांनी तसे ट्वीट करून जाहीर के ले. याआधी ३० डिसेंबरला १ लाख ८२ हजार मेगावॉट वीजमागणी नोंदवली गेली होती.
महाराष्ट्रात बुधवारी तब्बल २१ हजार ९२३ मेगावॉट इतकी वीजमागणी नोंदवली गेली. महानिर्मितीच्या प्रकल्पांमधून ६३२५ मेगावॉट तर के ंद्रीय वीजप्रकल्पांमधून ५७५९ मेगावॉट वीज मिळाली. याबरोबरच साखर कारखान्यांच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पांमधून १२२७ मेगावॉट वीज मिळाली. बाकीची वीज विविध कंपन्यांशी के लेल्या वीजखरेदी करारानुसार घेण्यात आली. मुंबईतही वीजमागणी २३५० मेगावॉटपर्यंत पोहोचली आहे.







