महावितरणचा भोंगळ कारभार; सातारा जिल्ह्यातील एक दोन नव्हे तर चक्क ५० गावे अंधारात

satara-mahavitaran

सातारा (जिल्हा प्रतिनिधी शरद मोरे) – खटाव महावितरण उपविभागाकडून वीज पुरवठ्यातील अडथळे दूर करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक गावांत वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. जुने व कमी क्षमतेचे ट्रान्स्फॉर्मर, गंजलेले खांब, लोंबकाळणाऱ्या वीज वाहिन्या व झाडांच्या फांद्यामुळे वीजपुरवठ्यात अडथळे निर्माण होत आहेत. दरम्यान, अपुरे कर्मचाऱ्यांमुळे मंडळाकडे तक्रारी करूनही त्यावर कार्यवाही होत नाही.

खटाव महावितरण उपविभागात सुमारे ५० गावे येतात. या परिसरातील अनेक गावे डोंगर कपारीत आहेत. त्यासाठी झाडाझुडपातून विद्युत वाहिन्या नेण्यात आल्या आहेत. अनेक गावांमध्ये लोखंडी खांब गंजले असूनही बदलण्यात आले नाहीत. काही ठिकाणी वाकलेले खांब कोणत्याही क्षणी पडण्याच्या स्थितीत आहेत. विद्युत वाहिन्याही जुन्या झाल्याने वारंवार तुटण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे जीवितहानी होण्याचा धोकाही वाढला आहे.

याबरोबरच अनेक गावांमध्ये अद्याप ३० ते ४० वर्षांपूर्वी बसवलेले कमी क्षमतेच्या ट्रान्स्फॉर्मरच नवीन कनेक्‍शन देण्यात येत आहेत. प्रमाणापेक्षा जास्त कनेक्‍शन असल्याने लोड येऊन ट्रान्स्फॉर्मर जळण्याचे प्रसंग घडत आहेत. येथील आण्णा भाऊ साठेनगरातील ट्रान्स्फॉर्मर दोन दिवसांपूर्वी जळाला.

ग्रामपंचायतीने महावितरण विभागाकडे तक्रार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी संबंधित कर्मचारी हजर झाले. त्यानंतर नवीन ट्रान्स्फॉर्मर वडूजवरून आणण्यासाठी ग्रामपंचायतीने वाहन उपलब्ध केले. ट्रान्स्फॉर्मर बसवल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here