कोलकाता – टीम इंडियाचे माजी कॅप्टन आणि भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर गुरुवारी दुसऱ्यांदा अॅन्जिओप्लास्टी करण्यात आली आहे. गांगुलीला छातीमध्ये दुखत असल्यानं बुधवारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. ज्येष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉ. देवी शेट्टी यांनी गांगुलीच्या सर्व रिपोर्टची पडताळणी केल्यानंतर अॅन्जिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्याच्या धमन्यांमध्ये दोन स्टेन्ट देखील टाकण्यात आले आहेत.
यापूर्वी दोन जानेवारी रोजी गांगुलीला घरात जीममध्ये वर्क आऊट क,रताना हार्ट अटॅक आला होता. त्यावेळी त्याला कोलकात्याच्या वुडलँड्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी देखील त्याच्यावर अॅन्जिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यावेळी गांगुली पाच दिवस हॉस्पिटलमध्ये होता. सात जानेवारी रोजी त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता.
गांगुलीवर उपचार करण्यासाठी 9 सदस्यांची टीम बनवण्यात आली होती. डॉक्टर देवी शेट्टी, आर.के.पांडा, सॅम्युअल मॅथ्यू, अश्विन मेहता आणि न्यूयॉर्कमधून शमिन के शर्मा यांचा सल्ला घेऊन गांगुलीच्या रक्तवाहिनीमध्ये स्टेन्ट टाकण्यात आली होती. यापूर्वी डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार गांगुलीला बुधवारी रात्री शांत झोप लागली होती. तसंच त्यानं सकाळी हलका नाश्ता देखील केला. गांगुलीचे सर्व रिपोर्ट्स पाहिल्यानंतरच त्याच्यावरील पुढील उपचाराचा निर्णय घेण्यात आला.







