राम मंदिराच्या उभारणीसाठी ८३ वर्षांच्या साधूने दिले १ कोटींचे दान

ram-mandir

ऋषिकेश – अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहावे यासाठी रामभक्त आपापल्या परीने दान देत आहेत. ऋषिकेशमधील एका 83 वर्षीय साधूने या मंदिराच्या निर्माणासाठी तब्बल 1 कोटी रुपये दान केले आहेत. बुधवारी ऋषिकेशमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेमध्ये त्यांनी निधीच्या रकमेचा धनादेश जमा केला. स्वामी शंकर दास असे या साधूचे नाव आहे.

स्वामी शंकर दास हे 60 वर्षांपासून ते ऋषिकेशमधील एका गुहेत राहात आहेत. ते जेव्हा 1 कोटी रुपयांचा चेक घेऊन बँकेत पोहोचले तेव्हा धनादेश बघून बँकेतल्या कर्मचाऱ्यांना आश्चर्य वाटले. यावर दास यांनी सांगितले की त्यांचे गुरु ‘टाटवाले बाबा’ यांच्याकडे जे भक्त येतात त्यांनी दान केलेल्या रकमेतून ही रक्कम गोळा झाली आहे. स्वामी शंकर दास बुधवारी बँकेत धनादेश जमा करण्यासाठी गेले होते तेव्हा धनादेश खरा की खोटा याबाबत चौकशी करण्यात आली.

दास यांनी जमा केलेल्या निधीबाबत आणि धनादेशाबाबत बोलताना ऋषिकेशमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सुदामा सिंघल यांनी सांगितले की जेव्हा त्यांना दास नावाच्या व्यक्तीने धनादेश जमा केला असून तो खरा आहे अथवा नाही असा गोंधळ निर्माण झाल्याचे कळाले तेव्हा ते बँकेमध्ये पोहोचले. बँकेने दास यांनी ज्या खात्यातून धनादेश दिला आहे त्या खात्यामध्ये पुरेशी रक्कम आहे अथवा नाही याची खात्री करून घेतली. ही खात्री करून घेतल्यानंतर दास यांना बँकेने धनादेश जमा करून घेतल्याची पावती दिली. बँक आता धनादेश वठवणार असून ही रक्कम राम मंदिर निर्माणासाठी तयार करण्यात आलेल्या ट्रस्टच्या खात्यात जमा करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here