नवी दिल्ली – एकीकडे कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनानं गजबजून गेलेली राजधानी दिल्ली शुक्रवारी सायंकाळी स्फोटानं हादरलीय. प्राथमिक माहितीनुसार, दिल्ली स्थित इस्रायली दूतावासाजवळ हा स्फोट झाल्याचं समजतंय. इस्रायली दूतावासापासून जवळपास जवळपास १५० मीटर अंतरावर हा स्फोट झाला. स्पेशल सेल घटनास्थळी दाखल झालंय. या स्फोटामुळे काही गाड्यांचं नुकसान झालेलं दिसून येत असलं तरी या घटनेत कोणत्याही प्रकारे जीवितहानी झालेली नाही किंवा कुणीही जखमी झालेलं नाही.

जिंदल हाऊसच्या बाहेर असलेल्या झुडुपांत आढळलेल्या एका पिशवीत असलेल्या स्फोटकांमुळे हा स्फोट झाल्याचं समजतंय. ‘आयईडी’च्या माध्यमातून हा स्फोट घडवून आणण्यात आल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसतंय.हा भाग संवेदनशील समजला जातो. ब्राझीलचा दूतावासही जवळच आहे. या भागात नेहमीच कडक सुरक्षा व्यवस्था तैनात असते
स्फोट झालेल्या परिसरापासून काहीच किलोमीटर अंतरावर ‘बिटिंग द रिट्रीट’ सोहळा सुरू आहे. स्फोट कमी तीव्रतेचा असल्याचं समजतंय. स्फोटामुळे इस्रायली दूतावासाच्या बाहेर उभ्या असलेल्या अनेक गाड्यांच्या काचा फुटल्याचीही माहिती मिळतेय.







