जयपूर – राजस्थानातील नीम का खेडा गावामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीचा भयंकर छळ करण्यात आला आहे. या व्यक्तीचं नाव अमर सिंह तन्वर असून ते 50 वर्ष आहेत. तन्वर हे निवृत्त कर्मचारी आहे. त्यांचं अपहरण करून त्याचा छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी एका जोडप्याला अटक केली आहे. अमर सिंह तन्वर यांचा छळ करण्यासाठी त्यांच्या गुप्तांगावर मिरची पावडर टाकण्यात आली होती.
तन्वर हे मूळचे मध्यप्रदेशातील राजगडचे रहिवासी आहेत. त्यांचं शिव सिंह आणि त्याची बायको कमली हिने अपहरण केलं होतं. शिव सिंह हा अमर सिंग तन्वर यांचा लहान भाऊ आहे. तन्वर यांचं अपहरण करण्यासाठी या जोडप्याला गोकुळ, देवी सिंह आणि बदामबाई नावाच्या आरोपींनी मदत केली होती. तन्वर यांना अपहरण केल्यानंतर एका घरामध्ये नेलं आणि तिथे त्यांना बेदम मारहाण केली. मारहाणीवर हे आरोपी थांबले नाहीत, त्यांनी तन्वर यांना विवस्त्र करत त्यांच्या गुप्तांगावर मिरची पावडर टाकली. या सगळ्याचा व्हिडीओही आरोपींनी चित्रीत केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर आरोपींनीच अपलोड केला होता जो नंतर व्हायरल झाला. तन्वर यांना बेशुद्धावस्थेत त्यांच्या घराच्या बाहेर शनिवारी रात्री फेकून देण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले आहे.
अमर सिंह तन्वर यांना शुद्ध आल्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली. चौकशीदरम्यान त्यांना आरोपींची नावे कळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शिव सिंह आणि कमलीला रविवारी बेड्या ठोकल्या. शिव सिंहने हा सगळा प्रकार संपत्तीच्या वादातून केला असल्याचं तन्वर यांच्या चौकशीदरम्यान पोलिसांना कळालं आहे. सोमवारी शिव सिंह आणि त्याच्या बायकोला न्यायालयासमोर हजर केलं असता त्यांना न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत सुनावली. इतर आरोपींचा शोध सुरू असून त्यांना लवकरच पकडण्यात येईल असं पोलीस उपअधीक्षक देवेंद्र सिंह राजावत यांनी सांगितले.







