पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी केली ६५ जातींच्या २०२६ पक्ष्यांची नोंद
जळगाव (संपादक सुनिल पाटील) – २ फेब्रुवारी जागतिक पाणथळ प्रदेश दिनाचे महत्व लक्षात घेऊन वाघुर धरण परिसरात पक्षी गणना करण्यात आली.या गणनेत ६५ जातींचे २०२६२ पक्ष्यांची नोंद करण्यात आल्याची माहिती पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी आमच्या प्रतीनिधीशी बोलतांना दिली.
याबाबत बोलताना ते पुढे म्हणाले की पक्षी व पर्यावरण यांचा परस्पर संबंध आहे,पाणथळ पक्ष्यांचे अस्तित्व हे पाणथळ प्रदेशच्या/जागेच्या गुणवत्तेवर अवलंबून आहे.पाणथळ जागी पक्ष्यांच्या किती जाती आहेत व किती संख्येनी आहे त्यावर पाणथळ जागेची गुणवत्ता ठरत असते. त्या दृष्टीने पाणथळ पक्षी गणनेचे महत्व आहे.हे ओळखून आम्ही ही गणना केली.
या गणनेत पाणथळ पक्ष्यांमध्ये प्रामुख्याने वारकरी-५८०,मोठी लालसरी-१४०,तरंग-१२५, प्लावा-१२५,छोटा णकावळा-८८, तलवार बदक -७०अटल बदक-६८ नोंदवण्यात आल्याचे सांगून ते म्हणाले की यांचे सोबत अल्प संख्येने गडवाल,तरंग थापट्या,चक्रांग,भुवई,जांभळी पाणकोंबडी,नदी सुरय,मोठाबगळा,ठिपकेवली तुतारी,कंठेरीचिखला,पाणकाडी बगळा,मोऱशराटी,काळा शराटी,नकट्या,शेकाट्या,चिखल्या,उघड चोच करकोचा,आशियाई कवडी मैना,करडा धोबी,पिवळा धोबी,पांढर्या भुवईचा धोबी,पांढरे धोबी,रिचर्ड्सची तीरचिमणी इत्यादी पाणपक्षी नोंदण्यात आले.
या गणनेत अपेक्षित असणारे चक्रवाक,नयनसरी,शेंडीबदक,चमच्या,तिरंदाज, पाणलाव,हिरवा तुतार,छोटा आर्ली,कैकर,युरेशियन दलदल,मोठा पाणकावळा,भारतीय पाणकावळा,राखी बगळा,काळ्या डोक्याचा शराटी,रंगीत करकोचा,कांडेसर हे पक्षी दिसले नाही.











