सिवनी – नागपूर राज्यमार्गावर पडला पैशांचा ‘पाऊस’

currency-rain

सिवनी (मध्य प्रदेश) – सिवनी-नागपूर राष्ट्रीय मार्गावर रविवारी रात्री अचानक पैशांचा ‘पाऊस’ सुरू झाला. सिवनी जिल्ह्यातील बनहानी गावातील नागरिकांनी ते पाहिले. एका कारमधून पाचशेच्या नोटा हवेत उडत होत्या. त्यातील एकानेच पोलिसांना ही माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारच्या इंजिनमधून धूर निघत होता. त्यामुळे कारमधील लोक उतरले आणि त्यांनी बोनट उघडले. त्याचवेळी जळालेल्या पाचशेच्या नोटा हवेत उडू लागल्या. सिवनी पोलिसांनी या प्रकरणात उत्तर प्रदेशातील तीन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १ कोटी ७४ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. कारच्या बोनटमधून दोन कोटी रुपये घेऊन जात असल्याचा दावा आरोपींनी केला आहे.

कारमधील आरोपींनी कोट्यवधी रुपये किंमतीच्या नोटा कारच्या बोनटमध्ये लपवल्या होत्या. रस्त्यात वाहन तपासणी झाली तरी पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून त्यांनी नोटा बोनटमध्ये लपवल्या होत्या. मात्र, इंजिनमधून धूर येऊ लागल्याने कारमधील लोकांनी बोनट उघडले. त्यावेळी नोटा हवेत उडू लागल्या, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर कारमधील लोक पळू लागले. पोलिसांनी त्यांना पकडले. कार मुंबईतील असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली असून, ते उत्तर प्रदेशातील आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here