मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – मुंबई महापालिकेचे सहआयुक्त रमेश पवार पाणी समजून सॅनिटायझर प्यायलाचा प्रकार समोर आला आहे. मुंबई महापालिकेचं बजेट आज सादर केला जात असून यावेळी हा प्रकार घडला. शिक्षण बजेट मांडलं जात असताना पाण्याची बाटली समजून रमेश पवार यांनी सॅनिटायझरची बाटली उचलली आणि प्यायले. यावेळी उपस्थितांनीही सॅनिटाझर प्यायलं असल्याचं त्यांच्या लक्षात आणून दिलं. यानंतर काही वेळासाठी ते तिथून बाहेर पडले आणि नंतर पुन्हा येऊन कामकाजात सहभागी झाले.
नुकतंच यवतमाळमध्ये असा काहीसा प्रकार घडला आहे. पोलिओ लसीकरण मोहिमेदरम्यान चिमुकल्यांना पोलिओच्या लसीऐवजी चक्क सॅनिटायझर पाजण्यात आल्याची संतपाजनक घटना घाटंजी तालुक्यातील भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कापसी (कोपरी) येथे घडली आहे. सॅनिटायझर पाजल्यामुळे प्रकृती बिघडल्याने १२ बालकांना रविवारी रात्री यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं. याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यासह दोन आरोग्य कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव चौकशी समितीने दिला आहे.







