मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – कोरोनाचा प्रभाव कमी होत चालला असून, तो पूर्ण नियंत्रणात येताच मुंबईतील नाईट लाईफ लवकरच सुरू केले जाईल, असे पर्यावरण मंत्री व मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी सांगितले.
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडे नोंद असलेल्या हॉटेल्सना 1 एप्रिलपासून उद्योगाचा दर्जा देण्यात येणार असून, रेस्टॉरंट व्यवसायाचा मात्र स्वतंत्र अभ्यास केला जात आहे. भविष्यात रेस्टॉरंट्स क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हॉटेल क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबाबत फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (एफएचआरएआय) आणि हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया (एचआरएडब्ल्यूआय) या संघटनांनी आदित्य यांचा सह्याद्री अतिथीगृहावर मंगळवारी सत्कार केला. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, एकदा सुरू केलेली गोष्ट पुन्हा बंद करायची नाही, असा शासनाचा प्रयत्न आहे. आता 1 फेब्रुवारीपासून लोकल सेवा सुरू केली. आता कोरोनाचा प्रभाव कमी झाला असून तो पूर्णपणे नियंत्रणात येताच नाईट लाईफदेखील सुरू करण्याचे नियोजन आहे.
पर्यटन विभागाच्या मुख्य सचिव वल्सा नायर सिंग यांनी सांगितले की, हॉटेलचालकांच्या सर्व संघटनांकडून नियमावली तयार करण्यासंदर्भात प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्यांचा विचार करून येत्या 10 दिवसांत हॉटेलसाठीची अंतिम नियमावली तयार केली जाईल. केंद्राच्या धर्तीवर ही नियमावली तयार होणार असली, तरी त्यातील मापदंड हे राज्य स्वतः तयार करणार आहे. राज्य शासन आणि हॉटेलचालकांच्या प्रतिनिधींची एक संयुक्त समिती स्थापन करण्याची मागणी एचआरएडब्ल्यूआयचे अध्यक्ष शेरी भाटिया यांनी कार्यक्रमात केली.







