ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – मानखुर्दमधील मंडाला परिसरात भंगाराच्या गोदामांना आज दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. दाटीवाटीने असलेल्या गोदामांतील तेल आणि केमिकलच्या शेकडो डब्यांमुळे आगीचा प्रचंड भडका उडाला. आग इतकी भीषण होती की तब्बल पाच किलोमीटर परिसरात धुराचे लोट पसरल्याने आकाश काळवंडले. त्यामुळे मुंबईकरांच्या उरात धडकी भरली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी 15 ते 20 गोदामे जळून खाक झाली. अग्निशमन दलाकडून रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते.
आग लागलेल्या ठिकाणची जागा जिल्हाधिकाऱयांच्या अखत्यारीत येत असून या ठिकाणी बेकायदा साठा करण्यात येत होता. याबाबत स्थानिक नगरसेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला वेळोवेळी कळवले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाने या आधी मुंबई महानगरपालिका व पोलिसांच्या मदतीने अनेक वेळा कारवाईसुद्धा केली. परंतु पाठ फिरताच पुन्हा भूमाफिया तिथे सक्रिय होऊन बेकायदा अड्डे बनवतात. त्यामुळेच ही आजची दुर्घटना घडली आहे. त्यामुळे येथील भूमाफिया टोळ्यांवर आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. आगीच्या दुर्घटनेनंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर व उपमहापौर अॅड. सुहास वाडकर यांनी आगीच्या ठिकाणी भेट देऊन आढावा घेतला.
गोदामात मोठय़ा प्रमाणात तेल आणि केमिकल तसेच भंगाराचे साहित्य मोठय़ा प्रमाणात असल्याने आग भडकत होती. आगीची तीव्रता वाढत असूनही अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. यात अग्निशमन अधिकारी हरीश नाडकर (40) जखमी झाले. त्यांना उपचारासाठी गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रपृती स्थिर आहे, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱयाने दिली.







