तामिळनाडूत सर्वांना मोफत मिळणार कोरोना लस

corona-vaccine-free

नवी दिल्ली – राज्यात सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस मोफत देण्याची घोषणा तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडप्पादी के. पलानीस्वामी यांनी आज केली. शुक्रवारी विधानसभेच्या अधिवेशनाला संबोधित करताना पलानीस्वामी यांनी, आम्ही पूर्वी जाहीर केल्यानुसार सर्वांना कोरोना लस मोफत देऊ आणि तामिळनाडूला कोरोना विषाणूपासून मुक्त करू, असे म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर सत्ताधारी पक्षाचे आमदार एम. सेम्मलाई यांनी कोरोनाची लस राज्यातील सर्वसामान्यांना आणि आमदारांना मिळण्यासाठी किती वेळ लागेल असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री सी विजयभास्कर म्हणाले, कोरोनाच्या संकटात अग्रस्थानी काम करणार्‍या 1 लाख 33 हजार आरोग्य कर्मचार्‍यांना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. यानंतर कोरोनाच्या लसीकरणासाठी पोलिस, महसूल कर्मचार्‍यांसह साडे आठ लाखांहून अधिक लोकांचा विचार सुरू आहे.

कोरोनाच्या मोफत लसीसोबतच राज्य सरकारने शेतकर्‍यांना मोठी भेट दिली. तामिळनाडू सरकारने विधानसभेत 12,110 कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली आहे. सहकारी बँकांकडून कर्ज घेतलेल्या 16.43 लाख शेतकर्‍यांना याचा फायदा होणार आहे. ‘राज्यात चक्रीवादळ, खराब हवामान आणि मुसळधार पावसाचा शेतीवर परिणाम होतो. तसेच त्याचा फटका शेतकर्‍यांना बसतो. त्यामुळे कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here