मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – मुंबईतील पत्रकारांच्या हितासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘द मुंबई प्रेस कल्ब’च्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ भाटिया हे विजयी झाले आहेत. कार्यकारिणी मंडळासाठी झालेल्या निवडणुकीत भाटिया यांनी तब्बल 365 मते मिळवली. त्यांच्याविरोधात पत्रकार सुधाकर कश्यप यांना 206 मते प्राप्त झाली. शनिवारी झालेल्या या निवडणुकीत पीडीए पॅनेलने आपले वर्चस्व राखत एपूण 16 पैकी 16 जागांवर विजय प्राप्त केला. या निवडणुकीत दै. ‘सामना’चे सौरभ शर्मा यांनीदेखील कार्यकारिणी सदस्यपदी विजय मिळविला.
द मुंबई प्रेस क्लबच्या द्विवार्षिक कार्यकारिणी मंडळासाठी झालेल्या या निवडणुकीत अगोदरपासून पीडीए पॅनेलने आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. चेअरमनपदी गुरबीर सिंग तर कोषाध्यक्ष पदासाठी छायाचित्रकार रजनीश काकडे यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर शनिवारी पार पडलेल्या निवडणुकीत उपाध्यक्ष पदासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’चे पत्रकार समर खडस यांनी 408 मतांनी विजय मिळवला. तर सचिवपदी ‘इका@नॉमिक्स टाइम्स’चे राजेश मस्करान्हस यांनी तब्बल 432 मते मिळवून दणदणीत विजय मिळवला. तर सहसचिवपदी छायाचित्रकार आशीष राजे यांनी 421 मते मिळवित विजय आपल्या नावे केला.
अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत कार्यकारिणी सदस्यपदी ‘मिरर नाऊ’ या वृत्तवाहिनीचे मयूरेश गणपत्ये यांनी सर्वाधिक 471 मते मिळवली. त्यापाठोपाठ ‘एबीपी माझा’च्या रश्मी पुराणिक यांनी 440 आणि ज्येष्ठ छायाचित्रकार प्रवीण काजरोळकर यांनी 436 मते मिळवत विजयी घौडदौड कायम ठेवली. त्यानंतर छायाचिकार सतीश माळवदे यांना 428, क्रीडा पत्रकार गॉर्डन डिस्कोटा यांना 402, पॅमेरामन किरण उम्रीगर यांना 396, दै. ‘सामना’चे सौरभ शर्मा यांना 393 मते तर पत्रकार इंद्रजित गुप्ता यांना 368 मते मिळाली.







