नवी दिल्ली – देशात कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाचा विळखा अधिक घट्ट होत असल्याचे दिसून येत आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांची उच्चांकी भर पडत आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूसंख्येतही वाढ दिसून येत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी त्यामुळे चिंता व्यक्त केली आहे.
नियंत्रण क्षेत्र धोरण तसेच भौतिक दूरत्वाच्या नियमाचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन यानिमित्ताने केले जात आहे. गेल्या एका दिवसात देशभरात उच्चांकी ३२ हजारांहून अधिक कोरोनाग्रस्तांची भर पडली. तर, ६०० हून अधिक कोरोना रूग्णांचा बळी गेल्या. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढले आहे. तर कोरोना संसर्गासोबत दोन हात करताना आतापर्यंत देशभरात ९९ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) कडून देण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळपर्यंत देशात तब्बल ३२ हजार ६९५ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तर, ६०६ रूग्णांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे यादरम्यान २० हजार ७८३ रुग्णांनी कोरोनवर मात मिळवल्याने त्यांना विविध रुग्णालयात डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या त्यामुळे ९ लाख ६८ हजार ८७६ झाली आहे. यातील ६ लाख १२ हजार ८१५ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. तर, ३ लाख ३१ हजार १४६ रुग्णांवर देशातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आतापर्यंत २४ हजार ९१५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनामुक्तीचा दर ६३.२५ टक्के झाला आहे. तर, कोरोनामुक्ती तसेच मृत्यूचे प्रमाण हे अनुक्रम ९६.०९ टक्के तसेच ३.९१ टक्के नोंदवण्यात आले आहे.
सर्वांधिक कोरोनाप्रभावित महाराष्ट्रासह (७,९७५), तामिळनाडू (४,४९६), कर्नाटक (३,१७६), आंध प्रदेश (२,४३२), दिल्ली (१,६४७), उत्तर प्रदेश (१,६५९) तसेच पश्चिम बंगालमध्ये (१,५८९) आढळून आले आहेत. या राज्यांच्या पाठोपाठ तेलंगणा (१,५९७), बिहार (१,३२८), गुजरात (९१५), राजस्थान (८६६), केरळ (६२३) तसेच मध्य प्रदेशात (६३८) कोरोनाबाधितांची भर पडली.







