पाणी घेण्यासाठी गेलेल्या दोघं बहिणींचा विहिरीत पडून मृत्यू

dindori-dead-girl

नाशिक (विशेष प्रतिनिधी) – दिंडोरी तालुक्यातील विळवंडी येथे दोन सख्ख्या बहिणी विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेल्‍या असता, विहिरीत पाय घसरून पडल्याने दोघींचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना काल (शनिवार) घडली.

दिंडोरी तालुक्यातील विळवंडी येथील उत्तम विठ्ठल पारधी यांच्या पद्मा उत्तम पारधी (वय 11) आणि फशा उत्तम पारधी (वय 9 ) या दोन मुली आहेत. काल (शनिवार) सकाळच्या सुमारास विळवंडी शिवारातील राजेंद्र पोपट पारधी यांच्या विहिरीवर हंडा घेऊन पाणी भरण्यासाठी या दोघी बहिणी गेल्‍या होत्‍या. यावेळी पाणी काढताना पाय घसरून पडल्याने दोघींचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. पदमा उत्तम पारधी इयत्ता 5 वी , फशाबाई उत्तम पारधी इयत्ता 4 थी मध्ये शिकत होत्या. त्रंबकेश्वर तालुक्यातील रोहिलेगाव आश्रमशाळे मध्ये या दोन बहिणी शिकायला होत्या.

dindori-wel

या घटनेची माहिती दिंडोरी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात घटनेचा पंचनामा केला. यानंतर दोन्ही बहिणींचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले. या घटनेचा अधिक तपास दिंडोरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिल कुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कल्पेश चव्हाण धनंजय शिलावटे करीत आहेत. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, दिंडोरी पोलिस अधिक तपास करत आहेत.

रात्री या दोन्ही बहिणींवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. उत्तम विठ्ठल पारधी यांना चार मुली व एक मुलगा असून एक महिन्यापूर्वीच एका मुलीचे गंभीर आजाराने निधन झाले होते आणि दोन मुलींचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याने पारधी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here