मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – बॉलिवूडमधील अभिनेत्री दिया मिर्झा व्हॅलेंटाइन डेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 फेब्रुवारी रोजी उद्योजक वैभव रेखी यांच्याशी विवाहबद्ध होणार आहे. एका वेबसाईटच्या माहितीनुसार, मुंबईत हा विवाहसोहळा होणार असून, त्यात केवळ दोन्ही कुटुंबीय आणि त्यांचे अगदी जवळचे मित्र यांचीच उपस्थिती असेल. वैभव रेखी हे मुंबईतील एका उद्योजक असून, बांद्र्याच्या पाली हिल परिसरात राहतात.

दिया मिर्झाचा पहिला विवाह साहिल संघा यांच्याशी झाला होता. दिया आणि साहिल हे अनेक वर्षं एकमेकांचे बिझनेस पार्टनर होते. 18 ऑक्टोबर 2014 रोजी ते विवाहबद्ध झाले होते. ऑगस्ट 2019मध्ये त्या दोघांनी आपण वेगळे होत असल्याची घोषणा सोशल मीडियावर केली होती. वेगळं झाल्यानंतरही आपल्यात कोणतीही कटुता नसल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. दोघांच्या सहीचं एक पत्र प्रसिद्ध करून त्यांनी याबाबतची घोषणा केली होती.
आयुष्याची 11 वर्षं एकमेकांसोबत व्यतीत केल्यानंतर आम्ही दोघांनी परस्परांच्या विचाराने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही मित्र होतो आणि पुढेही राहू. आम्ही प्रेमाने आणि सन्मानाने एकमेकांपासून वेगळे होत आहोत,’ असं दिया आणि साहिल यांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं. त्यानंतर जवळपास दीड-दोन वर्षांनी दिया आता पुन्हा विवाहबद्ध होत आहे.







