जम्मू – बरोबर दोन वर्षापूर्वी 14 फेब्रुवारी 2019 रोजी दहशतवाद्यांनी कश्मीरमधील पुलवामात सीआरपीएफ च्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला केला होता. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. आज पुन्हा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत होते. सुरक्षा दलाने दहशतवाद्यांचा हा कट उधळला असून सात किलो RDX म्हणजेच स्फोटकं जप्त केली आहेत. सुरक्षा दल आज साडे चार वाजता पत्रकार परिषद घेऊन याबद्दल विस्तृत माहिती देणार आहे.
जम्मूच्या बस स्थानकातून 7 किलो विस्फोटक साहित्य जप्त करण्यात आलं आहे. या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.याबद्दलची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं ट्वीट करत दिली आहे. सायंकाळी साडेचार वाजता जम्मू विभागाचे आयजीपी मुकेश सिंह माध्यमांना संबोधित करतील आणि या विषयावर अधिक माहिती देतील.
पोलिसांतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एवढ्या मोठ्या प्रमाणात विस्फोटक आढळण्याचा अर्थ मोठा हल्ला घडवण्याचा कट होता. या विस्फोटकांसोबतच एक संशयितालाही ताब्यात घेण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू रेल्वे स्टेशन, बस स्थानक आणि मोठ्या बाजारात हल्ला घडवण्याचा कट रचला गेला होता.







