‘टूलकिट’ प्रकरणातील २२ वर्षीय पर्यावरण कार्यकर्तीला दिल्ली पोलिसांनी केली अटक

disha-ravi

नवी दिल्ली – स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिचे शेतकरी आंदोलनाशी संबंधित कथित ‘टूलकिट’ समाजमाध्यमावरून प्रसारित केल्याबद्दल बेंगळूरुतील दिशा रवी या २२ वर्षीय पर्यावरण कार्यकर्तीला दिल्ली पोलिसांनी शनिवारी अटक केली. ती टूलकिट प्रकरणातील प्रमुख कारस्थानी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दिल्ली पोलिसांच्या ‘सायबर सेल’च्या अधिकाऱ्यांनी दिशा रवी हिला तिच्या घरातून प्रथम चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. ‘टूलकिट गूगल डॉक्युमेंट’ तयार करण्यात आणि ते प्रसारित करण्यात तिचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिला अटक करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने रविवारी सांगितले. दिशा रवी हिला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली.

दिशाचा लॅपटॉप आणि मोबाइल फोन जप्त करण्यात आला आहे. त्यातून ‘टूलकिट’ प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे आणि दिशा कोणाच्या संपर्कात होती याची माहिती मिळू शकेल, असा पोलिसांचा कयास आहे. प्रजासत्ताक दिनी शेतकरी मोर्चाच्या वेळी स्वीडनची पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने कथित ‘टूलकिट’ आपल्या ट्विटर खात्यावर प्रसारित केले होते. परंतु नंतर तिने ते काढून टाकले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ‘टूलकिट गूगल डॉक्युमेंट’चे संपादन दिशा हिने केले होते. ते समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात तिचा मोठा वाटा होता. ‘टूलकिट’बाबतचे हे प्रकरण गुन्हेगारी कटाचा भाग मानले जात असून त्याची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी गूगलच्या मदतीने ‘गुगल टूलकिट’ टाकणाऱ्यांचा ‘आयपी’ पत्ता शोधला होता. त्यातून दिशाचा थांग लावण्यात आला.

स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने शेतकरी आंदोलनाचे कथित ‘टूलकिट’ ट्विटरवर प्रसारित केले होते. त्यानंतर तिने शेतकरी आंदोलनाविषयी ट्विट केले होते. दिल्ली पोलिसांच्या ‘सायबर सेल’ने ४ फेब्रुवारीला ‘टूलकिट’निर्मात्या अनोळखी कथित खलिस्तान समर्थकांविरोधात भारत सरकारविरुद्ध सामाजिक, सास्कृतिक आणि आर्थिक युद्ध पुकारल्याचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हेगारी कट, देशद्रोह यांसह अनेक कलमांनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर दोन महिन्यांहून अधिक काळ शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. ग्रेटा थनबर्ग, प्रख्यात पॉप गायिका रिहाना यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय वलयांकित व्यक्तींनी समाजमाध्यमांद्वारे या आंदोलनाकडे लक्ष वेधले होते, तर काहींनी पाठिंबा दिला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here