दिल्ली – केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी गेल्या ७२ दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या विविध सीमेवर आंदोलन करत आहेत. मात्र त्याचा कोणताही परिणाम केंद्र सरकारवर झालेला नाही. त्यातच आता या कायद्याला विरोध करण्यासाठी एक टूलकिट बनवण्यात आले. ते टूलकिट बनवणारी दिशा रवी हिला दिल्ली पोलीसांनी अटक केली आहे.
दिशा रवी ही ‘टूलकिट गूगल डॉक्युमेंट’ ची संपादक आहे. हे डॉक्युमेंट बनवण्यात आणि त्याचा प्रसार करण्यात दिशा रवी चा हात असल्याचा दिल्ली पोलीसांचा दावा आहे. दिशा रवीने बंगळूरच्या खासगी कॉलेजमधून बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवी संपादन केली आहे. तसचं ती पर्यावरण कार्यकर्तीसुद्धा आहे.
टूलकिट मधील माहिती पोएटिक जस्टिस फाऊंडेशन या खलिस्तान समर्थक गटाशी संबंधित असल्याचे दिल्ली पोलीसांच्या प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाले आहे. दिशा रवीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दिशा रवीला झालेली अटक हा लोकशाहीवरील हल्ला असल्याचे मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मांडले आहे.
टूलकिट म्हणजे नेमकं काय?
जगाच्या वेगवेगळ्या भागात विविध विषयांवर आंदोलन होत असतात. आंदोलन करण्यासाठी त्याचा
आराखडा तयार करण्यात येतो. सुरु असलेले आंदोलन पुढच्या टप्प्यावर कशा पद्धतीने नेणे आणि ते अधिक तीव्र करणे. यासाठी जो कृती कार्यक्रम तयार केला जातो त्याला टूलकिट असं म्हणतात. आंदोलनाची पोस्टर वा पत्रक अनेकदा आपल्याला पाहयला मिळतात. त्याचे सोशल मिडीयातील स्वरुप म्हणजे टूलकिट हे होय. ज्या लोकांच्या माध्यमातून आंदोलनाची तीव्रता वाढवणे शक्य आहे. त्यांची आंदोलनाला मदत होते अशा लोकांना टूलकिट शेअर करतात. आंदोलनाच्या रणनीतीचा टूलकिट हा एक भाग असतो. टूलकिटचा वापर आंदोलनासाठी साठीच नाही तर राजकीय पक्षासह मोठमोठ्या कंपन्यांकडून स्वत:च्या फायद्यासाठी केला जातो.







