मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – राज्य पोलीस दलातील आयपीएस तसेच मपोसे अधिकाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या असून विशेष पोलीस महानिरीक्षक कैसर खलिद यांची लोहमार्ग पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर सायबर कक्षाच्या अधीक्षकपदाची जबाबदारी संजय शिंत्रे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. याशिवाय पंजाबराव उगले यांची ठाणे ऍण्टी करप्शन तर डॉ. महेश पाटील यांची मीरा-भाईंदरच्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती झाली आहे.
राज्य पोलीस दलातील प्रशिक्षण व खास पथके या पदाची धुरा सांभाळणारे कैसर खलिद आता लोहमार्ग पोलीस आयुक्त म्हणून कामकाज पाहतील तर लोहमार्ग पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर यांच्याकडे प्रशिक्षण व खास पथके याची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीत कार्यरत असलेले उपायुक्त संजय शिंत्रे यांची महाराष्ट्र सायबर कक्षाच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ऍण्टीकरप्शन ब्युरोच्या ठाणे विभागाचे अधीक्षक डॉ. महेश पाटील यांना मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील क्राइम बँचपदी नियुक्त केले आहे तर पंजाबराव उगले हे ऍण्टीकरप्शन ब्युरोच्या ठाणे विभागाचे अधीक्षक म्हणून काम पाहतील तर दोन दिवसांपूर्वी सात मपोसे अधिकाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानुसार नाशिक क्राईम ब्रँचचे उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांची मुंबईत बदली झाली आहे तर राज्य गुप्तवार्ता विभागातील उपायुक्त समाधान पवार यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन विभागातील अधीक्षकपद सोपविण्यात आले आहे.







