स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठानतर्फे चंद्रशेखर देशपांडे स्मृती राज्यस्तरीय नाट्यगीत गायन स्पर्धेचे आयोजन

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठान, पुणेतर्फे हौशी कलाकारांसाठी ज्येष्ठ ऑर्गनवादक कै. चंद्रशेखर हरिभाऊ देशपांडे स्मृती राज्यस्तरीय नाट्यगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 20 ते 40 आणि 40 वर्षांवरील अशा दोन वयोगटांसाठी असलेली ही स्पर्धा शनिवार, दि. 27 मार्च 2021 रोजी पुण्यात होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा चारुशीला केळकर आणि उपाध्यक्षा, संगीत रंगभूमीवरील गायक-अभिनेत्री सुचेता अवचट यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्पर्धेचे हे पहिले वर्ष आहे.

स्वरराज छोटा गंधर्व यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने 2018मध्ये प्रतिष्ठानची पुणे येथे स्थापना करण्यात आली. जुनी संगीत नाटके उभरत्या कलाकारांच्या साथीने पुन्हा मंचस्थ करून रसिकांना पुन:प्रत्ययाचा आनंद देणे आणि मराठी संगीत रंगभूमीचा समृद्ध वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे हा प्रतिष्ठानचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमातील पुढचे पाऊल म्हणून प्रतिष्ठानतर्फे हौशी कलाकारांसाठी या वर्षीपासून नाट्यगीत गायन स्पर्धेचे राज्यस्तरावर आयोजन करण्यात येत असल्याचे केळकर आणि अवचट यांनी सांगितले. या वेळी ज्येष्ठ कलावंत अशोक अवचट, चंद्रशेखर देशपांडे यांचे चिरंजीव सुनील देशपांडे उपस्थित होते.

स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठान, पुणेविषयी..
सौदागर नागनाथ गोरे उर्फ स्वरराज छोटा गंधर्व हे महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा असलेली संगीत नाटक परंपरा समर्थपणे पुढे नेणारे गायक-नट होते. आपले आयुष्य सर्वार्थाने संगीत नाटकांना समर्पित करताना छोटा गंधर्व अभिनय, गायन, दिग्दर्शन, संगीतकार या सर्व भूमिकांमध्ये समर्थपणे वावरले. लडिवाळ, गोड गाण्याने त्यांनी अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले होते. छोटा गंधर्व यांची संगीत सौभद्रमधील कृष्णाची तर संगीत मानापमानमधील धैर्यधराची भूमिका विशेष गाजली. प्रतिष्ठानतर्फे 2020मध्ये संगीत सुवर्णतुला नाटकाचा नव्या संचात केलेला प्रयोग रसिकमान्य ठरला. या नाटकाचा प्रयोग लॉकडाऊननंतर दि. 6 मार्च रोजी पुण्यात होत आहे. संगीत रंगभूमीसाठी नवीन कलाकार तयार करणे, शास्त्रीय-उपशास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांचे आयोजन, नव्या संचात जुन्या संगीत नाटकांचे प्रयोग प्रतिष्ठानतर्फे भविष्यात केले जाणार आहेत.

नाट्यसंगीत क्षेत्रात चंद्रशेखर हरिभाऊ देशपांडे यांचे योगदान खूप मोठे आहे. जवळपास 70 वर्षे त्यांनी नवोदित कलाकारांना नाट्यसंगीताचे धडे दिले आहेत. छोटा गंधर्व यांच्या बर्‍याच नाट्यप्रयोगांना त्यांनी ऑर्गनसाथ केली आहे. देशपांडे यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांच्या नाट्यसंगीता क्षेत्रातील स्मृती जपल्या जाव्यात हा हेतूने त्यांच्या नावे स्पर्धा घेण्याचे स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठान, पुणे आणि देशपांडे कुटुंबियांनी निश्चित केले आहे.

स्पर्धेची प्रवेश फी नाममात्र 200 रुपये असून दोन्ही गटात प्रथम, द्वितीय, तृतीय आणि दोन उत्तेजनार्थ अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी 3000/-, द्वितीय क्रमांकासाठी 2000/-, तृतीय क्रमांकासाठी 1000/- रुपये आणि उत्तेजनार्थ पारितोषिक प्रत्येकी 500/- रुपये आहे. तसेच प्रत्येक स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. नाट्यगीत सादर करण्याचा कालावधी 5 ते 7 मिनिटे असा आहे. स्पर्धकाने प्रवेश अर्जाबरोबर तीन नाट्यगीते नमूद करायची आहेत. त्यांपैकी परिक्षक सांगतील ते नाट्यगीत स्पर्धकाला सादर करावे लागणार आहे. नावनोंदणीची अंतिम मुदत 15 मार्च 2021 आहे.

प्रवेश अर्ज, स्पर्धेचे नियम याची सविस्तर माहिती स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठान, पुणेच्या फेसबुक पेजवर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 9822047801/9860164966 या क्रमांकांवर संपर्क साधावा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here