मुंबई (वृत्तसंस्था) – बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी चित्रपट अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांची त्यांच्या मुंबईतील मढ इथे असणाऱ्या बंगाल्यात भेट घेतली. ८०-९० च्या दशकात बॉलिवुडमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडलेल्या मिथुन चक्रवर्तीची लोकप्रियता आजही कायम आहे. मिथुन हे बंगाली अभिनते असले तरी त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मिथुनला मानणारा मोठा वर्ग पश्चिम बंगालमध्ये आहे. याचा बंगालमधील निवडणुकीमध्ये फायदा उचलण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. मात्र या वृत्ताला मिथुनने दुजोरा दिलेला नाही. मोहन भागवत आणि मिथुनची भेट ही एक औपचारिक भेट असल्याचे बोलले जात आहे.
मिथुन यांनी या भेटीनंतर आपल्या पुन्हा राजकीय पक्ष प्रवेशाचे वृत्त खोडून काढले. त्यांनी भाजपात प्रवेश करणार नसल्याचे सांगितले. कोणीही काहीही अंदाज लावू नका, अशी विनंती त्यांनी माध्यमांना केली. मिथुनने याअगोदर नागपूरमध्ये मोहन भागवत यांची सदिच्छा भेट
घेतली होती. आणि मुंबईत आल्यावर आपल्या घरी येण्याची विनंती भागवत यांना केली होती.
पश्चिम बंगामधील सत्ताधारी पक्ष असलेल्या तृणमुल काँग्रेसचे मिथुन चक्रवर्ती सदस्य होते. ते राज्यसभेचे खासदार सुद्धा राहिलेले आहेत. २०१६ मध्ये आपल्या प्रकृतीच्या कारणांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजिनामा दिला होता. बंगालच्या निवडणुकीत मिथुनच्या प्रसिद्धीचा वापर करण्याच्या तयारीत भाजपा असल्याचे पाहायला मिळत आहे.







