अमरावती – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमरावती जिल्ह्यामध्ये येत्या रविवारपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. अमरावातीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ही माहिती दिली आहे. पुन्हा राज्यात करोनाचा जोर वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअगोदर अमरावती जिल्ह्यात एक दिवसाचा लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाउन शनिवारी रात्री ८ वाजता सुरु होऊन तो सोमवारी सकाळी ७ वाजता संपणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात करोना रुग्णांची वाढ पाहायला मिळत आहे. चार दिवसांपासून तर ती संख्या अधिक झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. अमरावती मध्ये १४ फेब्रुवारी रोजी ४३५ रुग्ण सापडले. यातील २ जणांचा मृत्यू झाला. १५ फेब्रुवारी रोजी ४३९ रुग्ण आढळले तर ४ जणांचा मृत्यू झाला. १६ फेब्रुवारी रोजी ४९५ रुग्ण सापडले तर १७ फेब्रुवारीला ४९८ रुग्ण आढळून आले आणि ६ रुग्णांचा मृत्यू झाला.
हे आकडे पाहता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमरावती, यवतमाळ, अकोला या तीन जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउन लागण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मुंबईपेक्षा अधिक प्रमाणात करोना रुग्णांची संख्या अमरावतीमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी काही दिवसात मुंबईत करोना रुग्णांची संख्या वाढली तर मुंबईत सुद्धा लॉकडाऊन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.






