मुंबई (प्रतिनिधी) – देशात महागाईचा भडका उडालेला असताना अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार गप्प का आहेत, असा प्रश्न नवनियुक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. यापुढे महाराष्ट्रात अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार या अभिनेत्यांच्या चित्रपटाचे चित्रिकरण बंद पाडण्याची धमकी दिली आहे. तत्कालीन मनमोहन सिंग सरकारच्या वेळी हे दोन्ही अभिनेते ट्विटरच्या माध्यमातून सतत टिका करायचे. मग आता ते मोदी सरकारच्या काळात का गप्प बसले आहेत. अशी टीका पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.
महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल होऊन बसले आहे. दिवसेंदिवस डिझेल, पेट्रोल आणि गॅसची दरवाढ होत आहे. यावर कोणताही मोठा अभिनेता आवाज उठवताना दिसून येत नाहीत. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना थोडी जरी भाववाढ झाली तर हेच अभिनेते गळा काढून माध्यमांना प्रतिक्रिया द्यायचे. मग आता ते गप्प का आहेत. अशी विचारणा पटोले यांनी केली आहे.
दरवाढीवर टिवटिव करणारे अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन आता गप्प का आहेत. पटोले यांनी बुधवारी एक पत्रकार परिषद घेऊन एक प्रकारे दोन्ही अभिनेत्यांना इशाराच दिला आहे. युपीएचे सरकार देशात असताना ७० रुपये प्रतीलिटर पेट्रोलचे दर झाल्यावर याचं अभिनेत्यांनी ट्विट करुन सरकार विरोधी वातावरण तयार केले होते. मग आता पेट्रोलने शंभरी पार केली असताना हेच अभिनेते मुग गिळून गप्प का बसले आहेत.






