पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – कात्रज घाटात रस्त्याच्या कडेला साचलेल्या कचऱ्यात अवघ्या दोन दिवसाच्या बाळाला सोडून देण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या महिला सहायक पोलीस निरीक्षक मधुरा कोराने यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बाळाला ससून रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे दोन दिवसीय चिमुरड्याचा जीव वाचला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी बाळाला कचऱ्यात टाकून दिल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली. त्यानंतर रात्र गस्तीवर असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक मधुरा कोराने यांच्यासह मार्शल जमदाडे यांनी घटनस्थळी धाव घेत बाळाला उचलून घेतले. त्यानंतर बाळाला ससून रुग्णालयात दाखल केले. महिला अधिकारी बाळाला रुग्णालयात घेऊन जातानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यामुळे पोलिसांचे कौतुक केले जात आहे.
दरम्यान, याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस बाळाला टाकून पसार झालेल्या अज्ञाताचा शोध घेत आहेत.






