रत्नागिरी – रत्नागिरीतल्या नाणीज येथील नरेंद्रचार्य महाराज संस्थानने अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी भरघोस निधी दिला आहे. जवळपास 2 कोटी 53 लाख रुपयांचा निधी नाणीजमध्ये समारंभपूर्वक कार्यक्रमात देण्यात आला. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांच्याकडे नरेंद्रचार्य महाराज यांच्या हस्ते या निधीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. संस्थानने यापूर्वी कोरोना, दुष्काळ, अतिवृष्टी, अशा नैसर्गिक आपत्तीवेळीही शासन व लोकांना भरीव मदत केली आहे.
अयोध्येतील राम मंदिरासाठी गेल्या महिन्यापासून देशभरात देणग्या जमा करण्यासाठी मोहीम सुरू आहे. या मोहिमेत विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. राम मंदिरासाठी घरोघरी जात देणग्या गोळा केल्या जात आहेत. राम मंदिर न्यासानं यासाठी भारतीय स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदामध्ये खाती उघडली आहेत. दरम्यान अनेक जण सढळ हस्ते राम मंदिरासाठी निधी देत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातही हजारो हात राम मंदिराला देणगी देण्यासाठी पुढे आले आहेत.
दरम्यान प्रत्येक संकटात मदतीसाठी पुढे असणाऱ्या नाणीज येथील नरेंद्रचार्य महाराज संस्थाननेही राम मंदिरासाठी भरघोस निधी दिला आहे. 2 कोटी 53 लाख 24 हजार 152 रुपयांचा भरघोस निधीचा धनादेश श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांच्याकडे नरेंद्रचार्य महाराज यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.






