उत्तराखंड – हिमकडा कोसळल्याने आलेल्या जलप्रलयानंतर आता उत्तराखंडला भूकंपाचा धक्का बसला आहे. संध्याकाळी साडे चारच्या सुमारास हे धक्का बसले असून या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. उत्तराखंडमधील पित्तोरगढमध्ये हे धक्के सर्वाधिक जाणवले आहेत.
पवित्र गंगा नदीचे उगमस्थान असलेल्या उत्तराखंडच्या देवभूमीत 7 फेब्रुवारीला पुन्हा एकदा महाभयंकर जलप्रलयाने हाहाकार उडाला. चमोली जिल्ह्यातील तपोवनच्या जोशी मठ परिसरात हिमकडा तुटून ऋषिगंगा नदीत कोसळला. या नदीचा प्रवाह पुढे रैणी गावात धौलीगंगा नदीत मिसळला. त्यामुळे धौलीगंगा नदी अक्राळविक्राळ रूप धारण करून वादळाच्या वेगाने वाहू लागली. या महापुराचा प्रवाह इतका जबरदस्त होता की मार्गातील तपोवन धरण, बोगदा, आसपासची घरे पूर्णपणे भुईसपाट झाली. मोठमोठय़ा मशिनरी वाहून गेल्या. यात जवळपास 176 हून अधिक नागरिक वाहून गेल्याची भीती आहे. आतापर्यंत 63 जणांचे मृतदेह हाती लागले.






