नवी दिल्ली – करोना काळात लॉकडाऊन करण्यात आले त्यामध्ये अनेकांचे रोजगार गेले. अनेक तरुण बेरोजगार झाले. अनेकांचे उद्योग-धंदे बंद झाले. त्यामुळे देशात बेरोजगारांची संख्या वाढू लागली आहे. शिपायांच्या फक्त १३ पदांसाठी तब्बल २७ हजार ६७१ अर्ज दाखल झाले आहेत. हरियाणामधील पानीपतमध्ये बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे.
पानीपतच्या न्यायालयामध्ये शिपाई पदासाठी १३ जागांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. या भरतीसाठी जवळपास २७ हजार ६७१ अर्ज आले होते. या पदासाठी आठवी उत्तीर्ण असणारी व्यक्ती पात्र अशी साधी सरळ अट आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये पदवी, पदव्युत्तर पदवीपर्यत शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांचा समावेश आहे. देशात किती मोठ्याप्रमाणात बेरोजगारी वाढली आहे हे यावरुन दिसून येत आहे.
उच्च शिक्षण घेऊन देखील नोकरी मिळत नसल्यामुळे हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या जवळपास तीन हजार अर्जदारांना तपासणीसाठी आणि कागदपत्रांच्या पडताळणीसाठी बोलवण्यात आलं होतं. अर्जदाराच्या कागदपत्रांची तपासणी करुन ती अयोग्य असतील तर तो अर्ज रद्द केला जातो. २३ फेब्रुवारीपर्यत अर्जांच्या छाननीचे काम सुरु राहणार आहे. मात्र या एका उदाहरणावरुन हे सिद्ध होते की, देशात बेरोजगारीने कळस गाठला आहे. याला नेमकं कोण जबाबदार हे ज्याने त्यांने ठरवलं पाहिजे.






