जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना दोन महिन्यात तिसऱ्यांदा करोना झाल्याने आम्हाला काळजी वाटत आहे. त्यांना झालेल्या या करोनाची चौकशी नव्हे तर संशोधन होण्याची गरज असल्याची मागणी माजी मंत्री व भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी केली आहे.
जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीत केंद्र सरकारच्या अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत भूमिगत साठवण टाकी आणि पंपिंग हाऊसचा लोकार्पण सोहळा आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते आज झाला. हा कार्यक्रम पार पडल्यानतंर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांना तिसऱ्यांदा झालेल्या करोनाबद्दल आश्चर्य व्यक्त करीत या करोनाच्या संशोधनाची मागणी केली.
एकनाथराव खडसे यांना दोन महिन्यात तिसऱ्यांदा करोना झाल्याने त्यांची काळजी वाटत आहे. हा असा कोणता कोरोना आहे? जो इतक्या कमी वेळात तीन वेळा होतो. कोरोना एकदा झाला की तो लवकर बरा होत नाही, असे सांगितले जाते. म्हणूनच आम्हाला काळजी आहे. खडसेंना जो करोना होतो त्यावर संशोधन व्हायला हवे, अशी तिरकस मागणी गिरीश महाजन यांनी केली.






