मुंबई (प्रतिनिधी) – राज्यात होवू घातलेल्या मुंबई आणि पुणे महानगर पालिकेच्या निवडणुका शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र लढणार असल्याचे सुतोवाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले, ते पुण्यात बोलत होते. भाजपा विरोधात महाविकास आघाडी कोणती रणनिती आखून महापालिकेच्या निवडणुका लढवले, याबाबतची माहिती संजय राऊत यांनी दिली. आगामी पुणे महापालिका निवडणूक एकत्र लढण्याची सूत्र ठरलेली आहेत. मात्र यामध्ये काँग्रेसला कसे समावून घ्यायचे यावर तिन्ही पक्षामध्ये चर्चा सुरु असल्याचे राऊत यांनी सांगितले.
ज्या शहरात ज्या पक्षाची ताकत मोठ्याप्रमाणावर आहे त्या पक्षाने पुढाकार घेवून आगामी पालिका निवडणुका आघाडीला सोबत घेवून लढवाव्यात, असे संजय राऊत यावेळी म्हणाले. मुंबई कल्याण-डोंबिवली, संभाजीनगर ( औरंगाबाद ), नाशिकमध्ये शिवसेनेची ताकत आहे. त्या तुलनेत इतर पक्षांची ताकत कमी आहे. असेही राऊत यांनी नमूद केले.
राष्ट्रवादीची ताकत पुणे, पिंपरी-चिंचवड या ठिकाणी शिवसेनेपेक्षा अधिक असल्याचे सुद्धा राऊत यावेळी म्हणाले. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये निवडणुका कशा लढवायच्या याबाबत अजित पवार यांच्या सोबत चर्चा करुन निर्णय घेवू असेही त्यांनी सांगितले. आघाडी सरकारमधील घटक पक्ष एकत्र लढले तर महापालिकेमध्ये सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि राज्यातील महापालिकेमध्ये सत्ता परिवर्तनाचे एक नवे पर्व सुरु होईल यात शंका नाही, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.






