मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – राज्यात करोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. करोना रुग्णसंख्या वाढत असताना राज्यातील काही जिल्ह्यांत कठोर निर्बंध घेण्यात आले आहे आहेत. याच पार्श्वभूमीवर करोना संसर्गाबरोबरच अफवांचेही पेव फुटलं आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरु झाल्याचे मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
पुणे, नागपूर, अमरावती या जिल्ह्यांत रुग्णसंख्या वाढत असताना प्रशासनानं कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर, रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर संपूर्ण राज्यात कठोर निर्णय घेण्यात येईल, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. राज्यात करोना संसर्गाप्रमाणेच लॉकडाऊनच्या अफवांना उत आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या लॉकडाऊनच्या मेसेजवर सायबर गुन्हे शाखेची करडी नजर आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्याची खोटी अफवा पसरविणाऱ्यांवर सायबर गुन्हे शाखेची करडी नजर आहे. कुठल्याही अधिकृत माहितीशिवाय खोटी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.@MahaCyber1
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 22, 2021
अनिल देशमुख यांनी एक ट्विट करत अफवा पसरवणाऱ्यांना सक्त ताकीद दिली आहे. ‘महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्याची खोटी अफवा पसरविणाऱ्यांवर सायबर गुन्हे शाखेची करडी नजर आहे. कुठल्याही अधिकृत माहितीशिवाय खोटी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत,’ असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.







