मुंबई (प्रतिनिधी) – महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावला जाईल का? याबाबाबत सध्या लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे, कारण याआधी १०/११ महिन्याचा लॉकडाऊन भोगून जनता त्यातून अजून पूर्णपणे बाहेर पडलेली नाही. त्या लॉकडाऊनची झळ अद्याप जनता सोसतेय. अशातच पुन्हा लॉकडाऊन लागल्यास त्याचे काय परिणाम जनतेला सोसावे लागतील याची कल्पना न केलेलीच बरी, असेच म्हणावे लागेल.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही कठोर निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चर्चेची शक्यता आहे. जर कोरोनाचा असाच प्रकोप कायम राहिला तर पुन्हा एकदा लॉकडाऊन होईल का?
संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लागेल, याची शक्यता खूपच कमी आहे. परंतु सीमित लॉकडाऊन केला जाऊ शकतो. ठराविक भागांमध्ये लॉकडाऊन करायचं झाल्यास ज्या जिल्ह्यांमध्ये किंवा शहरांमध्ये कोरोनाच्या अधिक केसेस आहेत तिथे लॉकडाऊन होऊ शकतं.
11 महिन्यांपासून बंद असलेली लोकल सरकारच्या आदेशने पुन्हा सुरु झाली. परंतु लोकल सुरु झाल्यानंतर मुंबईत कोरोना केसेस वाढल्याचं समोर आलं आहे. जर येत्या 5 ते 10 दिवसांत असेच वाढलेले आकडे बघायला मिळाले तर मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो किंवा निर्बंध लादले जाऊ शकतात.
याअगोदरच्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांचे रोजगार बुडाले. शिक्षणक्षेत्राची अपरिमित हानी झाली. अशी परिस्थिती असताना पुन्हा एकदा लॉकडाऊन लादला गेल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. म्हणून पुन्हा लॉकडाऊन करण्यात येऊ नये, अशी प्रतिक्रिया जनतेतून येत आहे. सरकारने याचा जरूर विचार करावा, असे आवाहन बुलंद पोलीस टाईम्सतर्फे करण्यात आहे.






