महाराष्ट्रात रामदेवबाबांच्या करोनावरील रामबाण ‘कोरोनील’ विक्रीला मनाई

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – योगगुरू बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’ कंपनीनं तयार केलेल्या व करोनावर प्रभावी असल्याची जाहिरात केल्या गेलेल्या कोरोनील औषधावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशननं या औषधाविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे.

ट्वीटच्या माध्यमातून देशमुख यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. ‘पतंजलीच्या कोरोनील औषधाच्या वैद्यकीय चाचणीवर ‘आयएमए’ने प्रश्न उपस्थित केले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेसुद्धा हे औषध करोनावर परिणामकारक असल्याचा पतंजली आयुर्वेदचा चुकीचा दावा फेटाळला आहे. इतक्या घाईने हे औषध बाजारात आणणं आणि दोन ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी याला समर्थन देणं योग्य नाही,’ असं देशमुख यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हे औषध आणण्यात आले. सुरुवातीला रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे औषध असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र आता ते संपूर्ण करोनावर मात करणारे औषध म्हणून सांगितले जात आहे. प्रत्यक्षात या औषधाला कुठल्याही अधिकृत संघटनेकडून मान्यता मिळालेली नाही. ती मिळाली असल्यास तसं सिद्ध करावं, अशी मागणी ‘आयएमए’नं केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here