मुंबई (हितेश मिस्त्री) – मिंट रोड येथील भानुशाली इमारतीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांची संख्या 10 वर पोहोचली आहे. दोन जणांवर जे.जे. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे हॉस्पिटलकडून सांगण्यात आले.
म्हाडाच्या मालकीच्या असलेल्या या इमारतीची दुरुस्ती सुरू होती. त्यामुळे येथील रहिवाशांना अन्यत्र हलविण्यात आले होते, असे सांगण्यात येत होते. मात्र प्रत्यक्षात या इमारतीत रहिवाशी राहत होते. या इमारतीत 40 सदनिका असून यापैकी दुर्घटनाग्रस्त भागातील 12 सदनिका रिकाम्या करण्यात आल्या होत्या. मात्र त्या सदनिकांमधील घरगुती साहित्य काढण्यात आले नव्हते. म्हणून काही रहिवासी दुर्घटना घडण्यापूर्वी साहित्य बाहेर काढण्यासाठी सदनिकांमध्ये गेले होते. त्याचवेळी या इमारतीचा भाग अचानक कोसळला व यात 12 जण ढिगार्याखाली गाडले गेले. अग्निशमन दलाने तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले.
त्यामुळे रात्री उशिरापर्यंत अकरा जणांना बाहेर काढण्यात आले यापैकी 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 4 जणांचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. लॉकडाऊनपूर्वी या इमारतीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. यासाठी म्हाडाने कंत्राटदाराची नियुक्ती केली होती. पण लॉकडाऊनच्या काळात हे काम पूर्णपणे थांबल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. दरम्यान ढिगारा उपसण्याचे काम अजूनही सुरू असून हे काम लवकरच पूर्ण होईल असे पालिकेकडून सांगण्यात आले. या दुर्घटनेला जबाबदार कोण याची चौकशी म्हाडाच्या वरिष्ठ अधिकार्यांकडून केली जात आहे.







