..तर मुंबईतही लॉकडाऊन; पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले संकेत

मुंबई (प्रतिनिधी) – लग्नसमारंभ, तसेच इतर कार्यक्रम यांना लोक ५० जणांची परवानगी घेऊन ३०० लोकांना बोलावत आहेत. या परिस्थितीचा परिणाम असा होणार आहे की, सरकारला नाईलाजाने पुन्हा लॉकडाऊन लावावा लागणार आहे, असे पालकमंत्री अस्लम शेख यांनी संकेत दिले आहेत.

करोना साथ आटोक्यात आल्यानंतर मुंबई शहराने पुन्हा गती घ्यायला सुरुवात केली होती. परंतु जनता करोनाचे नियम काटेकोर पळत नाही, असे दिसून येते. त्यामुळे गती घेतलेल्या मुंबईला पुन्हा एकदा ब्रेक लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. फेब्रुवारीपासून करोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. मुंबईत रुग्णसंख्येचा दर ०.२२ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुंबईकरांना प्रतिबंधक उपायांचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. करोना असाच वाढत राहिल्यास आणि परिस्थिती बिघडल्यास सरकारला लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे आवाहन केले आहे.

हॉटेलात ५० टक्के लोकांना परवानगी दिली गेली आहे. तरीही ज्या हॉटेलात या नियमाचे पालन केले जात नाही त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्यांचे परवाने रद्द केले जातील. मुंबई महानगरपालिकेच्या म्हणण्यानुसार मुंबईतील घराघरात करोना बाधित सापडण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. त्यामुळे अनेक इमारती सील करण्याचे काम केले जात आहे. मुंबईत डिसेंबरनंतर करोना बाधितांचा आकडा घसरला होता. तो ०.१२ टक्क्यावर आला होता तोच आता वाढून ०.२२ टक्के झाला आहे. त्यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here