ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य; प्रकाश जावडेकर यांनी दिली माहिती
नवी दिल्ली – देशात १ मार्चपासून सामान्य नागरिकांना मोफत लसीकरणास सुरुवात होणार असल्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. “१ मार्चपासून ६० पेक्षा जास्त वय असणारे नागरिक तसेच इतर व्याधी असणाऱ्या ४५ हून अधिक वय असणाऱ्या नागरिकांचे लसीकरण केले जाणार असल्याचे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
“१० हजार सरकारी आणि २० हजार खाजगी केंद्रांवर ही लसीकरण मोहीम पार पडणार आहे. तसेच ही लस मोफत दिली जाणार असून सर्व खर्च केंद्र सरकार उचलणार असल्याचे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
प्रकाश जावडेकर यांनी यावेळी सांगितले की, “ज्यांना खासगी रुग्णालयातून लसीकरण करुन घ्यायचे आहे त्यांना पैसे भरावे लागतील. यासाठी किती पैसे मोजावे लागतील याचा निर्णय आरोग्य मंत्रालय पुढील तीन ते चार दिवसांत घेईल. आरोग्य मंत्रालयाची यासंबंधी रुग्णालये आणि लसनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांसोबत चर्चा सुरू आहे”.






