(माझा रशियाचा प्रवास.! लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रवास वर्णनातून)
पुणे (बाजीराव नाईक) –
सोवियत रशियात मी त्या रशियन जनतेच्या जीवनाचे अनेक पदर पाहिले. तिचा अपार उद्योग तिची विद्वत्ता आणि कला’ साहित्य आणि उदात्त संस्कृती हे सर्व पाहून मन थक्क झाले. जेव्हा आम्ही दिल्ली सोडली तेव्हा आमच्या शिष्टमंडळातील काही प्रवासी उदासीन होते. सोवियत विरोधी भांडवलदारी प्रचाराची छाया आमच्या मनावर कायम होती. समाजवाद करून किती प्रगती करू शकेल. एकूण एक मानव सुखी करणे कुणालाच या जगात शक्य नाही. कुठेतरी पोकळी असणारच असंच काहीस आमचं मत होतं. लखनऊ चे श्री. पुष्कराज भट एक विचारवंत असून ते आमदार आहेत. शिवाय ते काँग्रेस पक्षाच्या मताचे आहेत. कम्युनिस्ट बद्दल त्यांचे मत अनुकूल नाही. पण मनाने ते फारच दिलदार आहेत. ते रस्त्यात प्रत्येक गोष्ट अगदी चिकित्सक दृष्टीने पाहत होते. मॉस्को पर्यंत पुष्कराज माझे मित्र झाले होते. आमचं दोघांचं मत होतं की कितीही बिलंदर सत्ता असली तरी ती दारिद्र्य दडवू शकणार नाही. ते नग्न असतं आणि सर्वत्र दिसतं. म्हणून आम्ही ते पाहण्याची खटपट करीत होतो. आमच्यापुढे कसलाच पोलादी पडदा नव्हता. पण जेव्हा आम्ही प्रवास करत तास्कंद शहरात दाखल झालो तेव्हा पुष्कराज संपूर्ण बदलले होते. रशियन जनतेची ती प्रगती पाहून आम्ही सर्वच प्रभावित झालो होतो. मात्र पिण्याचा कार्यक्रम आमचा कायम होता. मला रशियन मुळीच येत नव्हतं. तर श्री. पुष्कराज यांना थोडं थोडं कळत होतं. कसलीही पाटी दिसली की ते उभे राहून एक एक रशियन अक्षर वाचत मी नुसताच आ करून पाहत असे. रशियन येत नाही म्हणून मला फार वाईट वाटे.एकदा दुपारचं जेवण उरकून पुष्कराज आणि मी आम्ही दोघं हिंडत हिंडत एका बागेत शिरलो. त्या बागेत पंधरा-वीस लोक हिरवळीवर लोळत होते. काही वृत्तपत्र वाचीत होते. काही पत्र लिहिण्यात मग्न झाले होते. आम्हाला वाटले ही बेकारांची झुंड असून ही काम शोधून वैतागली असावी. आणि आता या बागेत येऊन पडली असावी मी एका गृहस्था जवळ बैठक मारली. मी माझ्या तीक्ष्ण नजरेने त्या इसमाला न्याहाळून घेतला. त्यांने आपल्या करड्या पल्लेदार मिशा पिळून त्याचे आकडे केले होते. त्याचा पोशाख नीटनेटका होता. त्याने एक मोठं पुस्तक घेतलं होतं. मी विचारलं
“तुम्ही असं का बसला आहात?”
“मंग कसं बसू? त्यानं उत्तर दिलं. मग मी खुलासा केला की आम्ही भारतीय असून इंडो सोवियत सांस्कृतिक संस्थेचे प्रतिनिधी आहोत. मला असं सांगा की तुम्ही नोकरी कोठे करता. का बेकार आहात. तो गृहस्थ पोटभर हसून म्हणाला आम्ही फारफार नोकरी केली आहे. आणि आता सेवानिवृत्त होऊन आराम करीत आहोत. आता पत्र वाचणे नातलगांना पत्र लिहिणे एवढच काम करीत असतो. आमच्या देशात तुम्हाला औषधालाही बेकार मिळणार नाही इथं समाजवाद आहे. पुढे मी काहीच विचारलं नाही आम्ही लगेच ती बाग सोडली आणि परत निघालो. चालता चालता पुष्कराज दिसतील त्या रशियन पाट्या उभं राहून वाचत होते. एका सुंदर इमारती पुढं एक लाल रंगाचा मोठा बोर्ड दिसला. आणि पुष्कराज थांबून तो वाचू लागले. मी नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे पाहू लागलो. आणि आम्हाला पाहून येणारे जाणारे ताश्कंद चे नागरिक थांबून आम्हाला पाहू लागले. पुष्कराजनी ती पाटी वाचून होताच मी हिंदीत विचारले कसली पाटी आहे ती, ही बँक आहे पुष्कराज यांनी मला हिंदीतून उत्तर दिदं आणि बाजूला उभी असलेली एक तरुणी चटकन पुढं येऊन हिंदीत म्हणाली ही बँक नसून आमची कायम स्वरूपाची निवडणूक कचोरी आहे. हा खुलासा ऐकून आमचे चेहरे धडाधड पडले. आणि आम्ही लगेच काढता पाय घेतला. दुसऱ्या दिवशी जवळ असलेले स्तलिन सामुदायिक शेत पाहिलं. तो सामुदायिक मळा म्हणजे एक वेगळे राज्यच आहे. आणि ते एक प्रकारचं आश्चर्यही आहे. कारण या मळ्याची स्थापना 1929 साली झाली. त्यावेळी फक्त तीनशे तीस एकर जमीन या मळ्याच्या मालकीची होती. 1934 सालि या मळ्यात फक्त दोन ट्रॅक्टर काम करीत होते. परंतु आज 1500 एकर जमीन या मळ्याच्या मालकीची असून. आता 34 ट्रॅक्टर तेथे काम करीत आहेत. तेथे सध्या अकराशे चार शेतकरी काम करीत असून त्यापैकी 475 स्त्रिया आहेत. या मळ्यात चार शाळा आहेत. 2500 कोंबड्या रोज मळ्यात अंड्यांचा ढीग लावीत आहेत. अकराशे पाळीव गाईंचे दूध काढण्यासाठी तेथे निराळे दूध केंद्र निर्माण करण्यात आले असून एकाच वेळी 16 गाई स्वखुषीने येऊन दूध देतात. त्यामुळे यात 13 दूध काढणारी यंत्र बसविले असून गायी रांग लावून दूध देतात. या मळ्याच्या मालकीची 7500 मेंढरे असून त्या भागात 375 घरं आहेत. आणि मालाची ने आण करण्यासाठी 20000 मोटर ट्रक्स पळापळ करत आहेत. शिवाय हायस्कूल दवाखाना जनावरांचा दवाखाना प्रसूतिगृह वगैरे सर्व पाहिले की माणसाची मती गुंग होऊन जाते. आम्ही गेलो तेव्हा द्राक्षाला नुकताच बहर आला होता. म्हणजे ती पिकली होती. काळी, जांभळी, गुलाबी, वाटोळी, लांबकुळी असे पंधरा प्रकार आणि आकार पाहिले की सोवियेत शेती सुधारण्याचे कौतूक नव्हे तर आश्चर्य वाटू लागते. आम्ही ती सुंदर द्राक्षे गिळतच त्यांचे कौतुक करीत होतो. तो सुंदर मळा ती संपन्न शेती ती सुंदर फळ फुलं नि सुखी माणसं पाहत आम्ही एका भव्य मंडपा खाली आलो. तो मांडव द्राक्षांच्या वेलींनी अच्छादला होता. सर्वत्र पिकलेल्या द्राक्षांचे घोस लोंबत होते. नि त्या मंडपाखाली आमच्या भोजनाची तयारी करण्यात आली होती. एका सुंदर टेबलावर अनेक प्रकारचे जेवण मांडले होते. त्यात खास भारतीय पद्धतीचा मसाला दरवळत होता. आणि त्या सुगंधात आम्हाला आपल्या घरची आठवण होत होती. या भोजना प्रसंगी मळ्याच्या अध्यक्षांनी एक भावपूर्ण असे भाषण केले. ते आमचं स्वागत करून म्हणाले तुम्ही आमचे शेजारी आहात आणि शांततेचे पाईक आहात. तुमचे पंतप्रधान पंडित नेहरू आज शांतता नांदावी म्हणून आलोट यत्न करीत आहेत. याचा अर्थ तुमचे आणि आमचे उद्दिष्ट हे एकच आहे. जर तुमची आणि आमची मैत्री चिरकाल राहील तर जगात कधीच युद्ध होणार नाही. अशी आमची श्रद्धा आहे. म्हणून भारत-रशिया हे दोन देश चिरायू होवोत. रशियात मी जिथे गेलो तिथं मला शांततेचा जयघोष ऐकू आला. तिथे प्रत्येक माणसाला शांततेचे वेडच जनू लागले आहे. याचा अर्थ ती जनता दुबळी आहे असा कोणी अर्थ घेऊ नये. ती जनता महान आहे. आणि प्रबळ ही आहे. भारत आणि रशिया या दोन देशांच्या हाती जागतिक शांतता सुरक्षित आहे. अशी तिथं सर्वांची श्रद्धा आहे. तिथं वृद्ध माता आपल्या मुलांनी व्यर्थ रणात मरु नये नि कुणाला मारू नये या एकाच विचारत आहेत. त्यांनी जगाव आणि या देशाला संपन्न करावं. आम्हाला शांतता हवी कारण शांततेच्याच काळात जीवनाला बहर येतो. कला प्रगत होते. फुलं फुलतात असा आमचा अनुभव आहे. युद्धाने काय होतं हे आम्ही प्रत्यक्ष पाहिलं आहे. म्हणून आम्हाला युद्ध नको. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे शांततेसाठी झटणाऱ्या आमच्या पंतप्रधानांना समग्र रशियन जनता लाख लाख दुवा देत आहे. रक्तपात नसावा हा सर्वत्र मंगल असाच हेतू आहे. या हेतूत अहंकार नाही. फाजील दुराभिमान नाही. मी तर असं म्हणेन की यात पवित्र हेतू आहे. आणि यात साऱ्या जगाचे कल्याण सामावले आहे. रशियन लोक भारताला खरा मित्र मानतात. म्हणूनच ते भारतीय संस्कृतीचा कसून अभ्यास करीत आहेत. ताश्कंद येथे आम्ही एक शाळा पाहिली. तिथं एकूण एक मुलं हिंदी भाषा शिकत होती. आम्ही शाळेत प्रवेश करताच आम्हाला भारतीय वातावरण जाणवले. प्रत्येक मुलं प्रत्येक शब्द हिंदीत उच्चारित होते. त्यामुळे माझी पाचावर धारण बसत होती. कारण माझी हिंदी मुंबईची हिंदी एखादा उच्चार चुकला की ही बेरकी पोरं अब्रू घेणार अशी मला भीती वाटत होती. म्हणून मी फार कमी बोलत होतो. त्याच दिवशी आम्ही ताश्कंद विद्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्या विशाल सभागृहात अफाट गर्दी झाली होती. आम्ही जरा उशिराच पोहोचलो. पण ते गुणी विद्यार्थी आम्हावर रागावले नव्हते. आम्ही सभागृहात प्रवेश करताच सर्व मुलं-मुली उठून त्यांनी टाळ्या वाजवून आमचे स्वागत केले. एका सुंदर मुलीने लाल गुलाबाची फुलं माझ्या हाती देऊन सांगितले ही आमच्या देशातील फुले तुम्ही भारतापर्यंत घेऊन जा आणि भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्या वीरांनी आत्मबलिदान केले त्यांच्या समाधीवर ते अर्पण करा. हा त्या मुलीचा संदेश नि ती फुले पाहून काळजात एक कळ उठली. आणि भारताने स्वातंत्र्य मिळवून आपली मुक्ती करून घेतली याला जगात आणि रशियात किती महत्त्व आहे याची मला महती पटली. रशियन माणसांना स्वातंत्र्य हा शब्द अतिशय प्रिय आहे. स्वतंत्र मानवा बद्दल त्यांना फार प्रेम वाटते. नि जे परदास्यात खितपत आहेत त्यांच्याविषयी अत्यंत आदराने तितकीच असता त्यांना वाटते. आला आला म्हणता तो दिवस आला आपल्या माय देशाकडे निघण्याची आमची तयारी झाली. जेट विमान सज्ज झाले आणि माझ्या हृदयाने ठाव सोडला. कॉम्रेड बानीकोव,श्रीमती इराणी मॉक्सीवोव, कॉम्रेड नबी महमद ही मंडळी विमानाच्या थेट शिडी पर्यंत येउन उभी राहीली. सर्वांच्या हृदयात कालवाकालव सुरू होती. डोळे भरत होते. मी अश्रू दहावीत होतो. आम्ही कडकडून भेटलो. ती अंतिम भेट होती. त्या महान देशाचे अंतिम दर्शन होतं. मी अंतरीची कळ दाबण्याचा बहाणा केला उगीच खिशे चाचपले म्हणालो अरे सिगरेट संपली की फक्त विसच आहेत. तेव्हा मला मिठी मारून कॉम्रेड मोक्सीवोव म्हणाले हे रशियन जेट विमान आहे तुम्ही दोन सिगारेट संपण्यापूर्वीच तुम्हाला ते तुमच्या राजधानीत पोहोचविल.मी आश्चर्याने पाहिलं. नि ते पुन्हा म्हणाले हे सरळ तुम्हाला हिमालयावरून घेऊन जाईल. आणि आता आपण आपल्या हिमालया वरून आपल्या मातृभूमीत जाणार या कल्पनेने मी भारावून गेलो. कॉम्रेड बानीकोव यांनी मला आपलं सुंदर पेन दिलं. ती गोड आठवण आणि त्या महान देशाचं अंतिम दर्शन घेऊन विमान उडालं आणि त्याची ती जबर भरारी सुरू झाली.यावेळी मनात निराळ्याच भावना उचंबळून उठल्या होत्या. मी वयाच्या अकराव्या वर्षी मुंबईला आलो त्या वेळी आमचं सारं कुटुंब दर मजल दर कोस करीत मुंबई जवळ करीत होतं. गाडी खर्च नव्हता म्हणून आम्ही मुंबईला पायी चालत निघालो होतो. चालुन माझे पाय सुजले होते. 227 मैलांचे अंतर कापायला आम्हाला दोन महिने लागले होते. आणि आता तोच मी मी मिनिटाला दहा मैल भरारी मारत होतो. तीस हजार पेक्षाही जास्त उंचीवरुन आमचे विमान उडत होते. मी खाली पाहत होतो. तेव्हा हिमालयाच्या मस्तकावर निसर्ग नुकताच हीमाचा वर्षाव करत होता. आणि तो महान गिरीराज आमच्या सरहद्दीवर आपल्या अनंत बाहू पसरून ताठ उभा होता. त्याचं ते दर्शन आणि सोव्हिएत रशियाची स्मृति मी कधीच विसरणार नाही. नव्हे ती विसरलं शक्य नाही. रशियातील माझं भ्रमण म्हणजे माझ्या जीवनाचे साफल्य मी मानतो. नकळत माय देशाची ओढ वाढू लागली. त्या नादात मी एक सिगारेट ओढून टाकली आणि दुसरी पेटविली तोच पुढे लाल पाटी लागली आणि दिल्ली दिसू लागली .!!
(लेखक बहुजन परिवर्तन पार्टी प्र महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती (रजि)चे संस्थापक अध्यक्ष आहेत.)







