मोहाली (पंजाब) – प्रसिद्ध पंजाबी गायक सरदूल सिकंदर यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर मोहालीतील फोर्टीस रुग्णालयात उपचार सुरू होते. 66 वर्षीय सिकंदर हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते व रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांना कोरोनाची लागण झाली होती.
‘सिंकदर यांच्या किडन्या निकामी झाल्या होत्या तसेच त्यांना इतरही अनेक आजार होते. 2016 साली त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लान्टची शस्त्रक्रीया झालेली. तसेच 2003 मध्येही त्यांच्यावर एक मोठी शस्त्रक्रीया झालेली. त्यांना मधुमेह देखील होता. त्यातच कोरोनाची लागण झाली. व त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला’, असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.
सिकंदर यांच्या मृत्यूनंतर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. ‘लिजेंडरी पंजाबी गायक सरदूल सिकंदर यांच्या मृत्यूने दु:ख झाले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोना झाला होता. आज पंजाबी संगीत पोरके झाले. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुखात मी सहभागी आहे’, असे ट्विट कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केले आहे.






