मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – आगामी २ मार्च रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी असली तरी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. सिद्धिविनायक मंदिर न्यास समितीने हा निर्णय घेतला आहे. राज्यासह मुंबईत करोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे भाविकांसाठी सिद्धिविनायक गणपतीचे ऑफलाईन दर्शन बंद ठेवण्यात आले आहे.
मुंबईत करोनाचे वाढती रुग्णसंख्या पाहाता हा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. ज्यांनी दर्शनाची रितसर परवानगी घेतलेली आहे त्यांनासुद्धा सकाळी ८ ते रात्री ९ दरम्यान दर्शन घेता येणार आहे. ज्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेले आहे आणि ज्यांच्याकडे रजिस्ट्रेशनचा क्यूआर कोड आहे अशा भक्तांना दर्शनाचा लाभ मिळणार आहे. हे क्यूआर कोड अहस्तांतरणीय असणार आहेत. व्हॉट्सअप, फोटोकॉपी आणि स्क्रिनशॉटद्वारे क्यूआर कोडची प्रत मंदिरात स्विकारली जाणार नाही.
मुंबईत दिवसेंदिवस रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी वाढू लागली आहे. ही आकडेवारी भितीदायक स्वरुप घेऊ लागली आहे. पहिला लॉकडाऊन संपल्यानंतर सुरु करण्यात आलेली सार्वजनिक ठिकाणे पुन्हा एकदा बंद होणार का? असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडू लागला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मंदिरांवर निर्बंध लावण्यास सुरवात झाली आहे.






